करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या लातूर शहरातील अल्फा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर दिनेश वर्मा यांच्यावर बुधवारी सकाळी सात वाजता प्राणघातक हल्ला झाला. सुदैवाने डॉक्टरांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर पी.बी. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे.

उदगीर शहरातील एका ७५ वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी अल्फा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करताना त्यांची प्रकृती चिंताजनक होती. नातेवाईकांच्या आग्रहाखातर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. मागील दोन दिवस त्यांच्या प्रकृती बद्दल नातेवाईकांना डॉक्टरांनी कल्पना दिली होती, त्यांना मधुमेह होता व ऑक्सिजन पुरवठाही शरीरात कमी होता. दरम्यान आज (बुधवार) पहाटे सव्वा पाच वाजेच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. डॉक्टर दिनेश वर्मा हे रात्री दोन वाजेपर्यंत रुग्णालयात होते, पहाटे पुन्हा त्यांनी पाच  वाजेनंतर रुग्णालयात रुग्णाची पाहणी सुरू केली होती. दरम्यान, सकाळी सात वाजेच्या दरम्यान तिसऱ्या मजल्यावर सहा-सात लोकं उभी असलेली त्यांना दिसली. त्यापैकी तिघांच्या तोंडाला मास्क नव्हता, यामुळे डॉक्टरांनी त्यांना हटकले व त्यातील एकाने माझ्या आईचे निधन झालेले आहे आणि मी नाराज असल्याचे सांगत तो त्यांना वाटेल ते बोलू लागला. यावर डॉक्टरांनी त्यांना तुम्ही तोंडाला मास्क लावून या, आपण बोलू असे सांगितले.

आणखी वाचा- ‘त्या’ मृत व करोनाबाधितांचा समावेश नेमका कुठे?

यानंतर लिफ्टमध्ये त्यांच्यासोबत तिघेजण आले दरम्यान डॉक्टर कोविड विभागाकडे जात असताना, त्यातील एकाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तीक्ष्ण हत्याराने डॉक्टरच्या छातीवर, गळ्याच्या खालच्या बाजूला, हातावर वार करण्यात आल्याने डॉक्टर जखमी झाले. यावेळी, डॉक्टरांची हल्लेखोरांबरोबर झटापटही झाली. डॉक्टरांनी संपूर्ण ताकद लावून हल्लेखोराला ढकलून दिले  व सुदैवाने सोबतच्या लोकांनी त्याला धरून ठेवले आणि त्यानंतर डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णालयात जाऊन स्वतः वर उपचार घेतले.

आणखी वाचा- उस्मानाबादेत कापड व्यावसायिकाच्या कुटुंबासह नातेवाईक करोनाबाधित

या घटनेचे वैद्यकीय क्षेत्रात गंभीर पडसाद उमटलेले आहेत. आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास कुलकर्णी यांनी अशा घटनेमुळे डॉक्टरांचे मनोबल खचत असल्याचे सांगत, करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांना चोवीस तास पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .आरोपी हा करोना पॉझिटिव्ह रुग्णाचा नातेवाईक असल्याने त्याची कोविडची चाचणी करून त्यानंतर त्याला ताब्यात घेतले जाणार आहे.