हिंसा आणि आरोपांचं टोक गाठणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. तर दुसरीकडे संपूर्ण ताकद पणाला लावूनही भाजला शंभर जागाही मिळवता आल्या नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या मोठ्या विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शक्तिशाली भाजपाला धोबीपछाड देत तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस २०० पेक्षा जास्त जागा जिंकत असल्याचं दिसत असून, भाजपा शंभरीच्या आतच दम तोडताना दिसत आहे. या निकालावर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“समोर कितीही बलाढ्य शक्ती असली, तरी त्यांच्याशी लोकांच्या साथीने त्याच आक्रमकपणे लढा दिल्यास त्यांनाही पराभूत करता येतं, याचं उदाहरण देशातील सर्वच पक्षांसाठी ममता बॅनर्जी दिदींनी दाखवून दिलं. या विराट विजयाबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेचं आणि ममता दिदींचं मनःपूर्वक अभिनंदन!,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अभिनंदन केलं आहे. “जबरदस्त विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन. चला आता लोकांच्या कल्याणासाठी आणि करोना महामारीविरुद्ध लढा देण्याचं काम एकजुटीने करू,” असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आधीपासूनच तयारी सुरू केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बंगालवर विशेष लक्ष केंद्रीत केलं होतं. निवडणूक प्रचारातही भाजपाने पूर्ण ताकद पणाला लावल्याचं दिसून आलं. मात्र, अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकलं नाही. तृणमूल काँग्रेसनं भाजपाला जबर टक्कर देत धोबीपछाड दिला.