ज्या विधानसभा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार मागे पडेल, तेथील आमदाराची उमेदवारी कापण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. अजूनही राष्ट्रवादीचे काही नेते निवडणूक प्रचारात सहभागी झाले नाहीत. अशांनी प्रचारात सहभागी होऊन आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी (माजी खासदार सूर्यकांता पाटील व शिवाजी माने यांचे नाव न घेता) दिला.
िहगोली मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांच्या निवडणूक प्रचाराचा नारळ वसमत येथे पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाढविण्यात आला. पालकमंत्री वर्षां गायकवाड, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, सातव, जयप्रकाश दांडेगावकर, प्रदीप नाईक, भाऊ पाटील गोरेगावकर, विजय खडसे, रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, रामराव वडकुते आदींची उपस्थिती होती. पवार यांनी शिवसेना नेतृत्वावर या वेळी जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व शिवसेनेला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. सेनेतून अनेक खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरे नेतृत्वाला काहीच घेणे-देणे नाही. ग्रामीण भागातील प्रश्न त्यांना कळलेच नाहीत, म्हणूनच ते गारपिटीने त्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मातोश्रीतून बाहेर पडले नाहीत, असा आरोप करून खासदार वाकचौरे यांना मारहाण करणारे शिवसैनिक नारायण राणे व भास्कर जाधव यांच्यासमोर का उभे ठाकत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.
िहगोलीची जागा जिंकलीच पाहिजे, या निर्धाराने कामाला लागा. या पूर्वीच्या निवडणुकीत वसमतमध्ये कमी मतदान झाल्याने िहगोलीची जागा गमवावी लागली. मात्र, आता गाफील राहू नका. जातीचे खुळ डोक्यातून काढून टाका आणि आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी एकदिलाने कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.