दुष्काळ निवारणाची जबाबदारी सर्वपक्षीयांची असल्याचे सांगून, दुष्काळाची झळ लोकांना बसता कामा नये. अन्यथा विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकावा लागेल, असा इशारा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत दिला.
मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत आपण दुष्काळ परिस्थतीसंदर्भात निवेदन सादर केले आहे. त्यात दुष्काळ व आपत्तिग्रस्तांना कृषी कर्जमाफी, नुकसान भरपाई, शैक्षणिक सवलती तसेच पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात आपले म्हणणे मांडले आहे. दुष्काळ निवारण ही शासनाबरोबरच सर्व पक्षीयांची जबाबदारी असून, दुष्काळाची झळ लोकांना बसता कामा नये. अन्यथा येत्या निवडणुकीत मतदानावर बहिष्काराची भूमिका घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला. दुष्काळाला सामोरे जाताना, शासनाचे निकष व आचारसंहितेचा बागुलबुवा असता कामा नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. निवडणुका होतच राहतात, पण लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. सातारा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत प्रशासनाला दिल्या असून, येथे कृषी विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होण्याबाबत येत्या ८ दिवसात ठोस कार्यवाहीची अपेक्षा उदयनराजेंनी केली.