राष्ट्रवादीचे राणा पाटील भाजपच्या वाटेवर, शिवसेनेत मात्र अस्वस्थता

वेध विधानसभेचा

रवींद्र केसकर, उस्मानाबाद</strong>

उस्मानाबाद जिल्ह्य़ाचे राजकारण म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील असे समीकरण एकेकाळी दृढ होते. मागील २० वर्षांत त्याला धक्के देत शिवसेनेने स्वत:चा गड निर्माण केला. सामान्य शिवसनिकांच्या ताकदीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. थोडक्यात, राजकारण कूस बदलत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले राणाजगजितसिंह पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. पाटील यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्य़ाच्या राजकारणाचा पोत पुन्हा एकदा भाऊबंदकीच्या भोवतीच फिरणार आहे. भावकीच्या जुन्या भांडणात नवा राजकीय रंग भरला जाईल. भाजपला पाटील यांच्या रूपाने नवा भिडू मिळणार आहे. राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशाने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत मात्र प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता प्रश्न आहे राष्ट्रवादीचा. राष्ट्रवादीवर नवा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप-शिवसेनेत डेरेदाखल होणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. पक्षांतर करणाऱ्या या नेत्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहेत. तरीही या नेत्यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकून पक्षांतर केलेच तर त्यांच्या जागी कोण उमेदवार द्यावेत, असा प्रश्न पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ‘प्लॅन-बी’ तयार केला आहे. नवे उमेदवार शोधून त्यांच्या खांद्यावर निवडणुकीची जबाबदारी देण्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या काही प्रमुख नेत्यांना कामाला लावले आहे. या सर्व घडामोडी उस्मानाबाद जिल्ह्य़ाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या आहेत. राणा पाटील यांच्या पक्षांतराची आता केवळ औपचारिकता बाकी असल्यामुळे त्यांच्यापुढे आव्हान निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादीने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्य़ात िखडार पडले आहे. एकीकडे शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते सामान्य मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच वेळी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यात योगदान देणारे डॉ. पद्मसिंह पाटीलही पक्ष सोडण्याच्या पवित्र्यात आहेत. अनेक वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असावेत, याची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवण्यात आघाडीवर असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यास भाजपमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याने शरद पवार यांना आव्हान दिले जाणार आहे. राष्ट्रवादी सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी सध्या पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. पालिका निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेत नगराध्यक्ष झालेले मकरंद राजेिनबाळकर शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ऐनवेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या गोटात घेऊन उमेदवारी देऊ शकते, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

तुळजापूर मतदारसंघातून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तर दुसरीकडे त्यांचे पुत्र सुनील चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या वावडय़ा उठल्या आहेत. चव्हाण यांनी त्याला दुजोरा दिला नसला तरी या वावडय़ांना नाकारलेलेही नाही. लोकसभा निवडणुकीत नाराज झालेले माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनीही त्यांची भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे ते सेनेबरोबर राहणार की मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी भाजपची वाट धरणार याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल मोटे मात्र कात्रीत सापडले आहेत. एकीकडे त्यांचा कारखाना अजित पवार यांनी चालविण्यासाठी घेतला आहे. ते एकमेकांचे निकटचे नातेवाईक आहेत. तर दुसरीकडे जिल्हापातळीवर राणाजगजितसिंह पाटील यांचे पाठबळ त्यांना गरजेचे आहे. त्यामुळे ते राणा पाटील यांच्याबरोबर जाणार की अजित पवार यांच्याबरोबर थांबणार हे अद्याप अस्पष्ट आहे.

उस्मानाबाद जिल्हा पक्षीय बलाबल

उस्मानाबाद – कळंब : राष्ट्रवादी

भूम-परंडा- वाशी : राष्ट्रवादी

तुळजापूर : काँग्रेस

उमरगा-लोहारा :शिवसेना

बदलत्या नैसर्गिक, भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ाच्या जिव्हाळ्याचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, रोजगार निर्मितीसाठी कौडगाव औद्योगिक वसाहतीत उद्योग उभे करणे या प्रमुख मुद्यांसह जिल्ह्य़ाच्या निरंतर विकासासाठी काही निर्णय घेणे आवश्यक आहे. याबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने शनिवारच्या कौटुंबिक संवाद सोहळ्यासाठी सर्वाना हक्काने निमंत्रित केले आहे. त्या ठिकाणी मी भूमिका मांडणार आहे.

– राणाजगजितसिंह पाटील

आपण शिवसेना सोडून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा पसरवली जात आहे, परंतु आपण पक्ष सोडणार नाही. विरोधकांनी माझ्या बदनामीचा डाव आखला आहे. मी राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला भेटलेलो नाही. मी विधानसभेसाठी इच्छुक आहे, हे खरे असले तरी पक्षाने उमेदवारी दिली तरच निवडणूक लढविणार अन्यथा, पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याचा प्रचार करणार.

– मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेना