भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात धान्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. बोगस ७/१२ दाखवून शेतकऱ्यांना मिळणारे धान्यासाठीचे अनुदान लाटण्याचा प्रकार अतिशय गंभीर असून, यासंदर्भात तातडीने विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात येऊन दोषींना कठोर शासन करण्यात यावे, असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल दिले.

यासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे आयोजित उच्चस्तरीय बैठकीस भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील, गृह, पणन आणि आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पोलीस अधिक्षक, भंडारा यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार आरोपींनी आदिवासी विकास महामंडळ, उप प्रादेशिक कार्यालय, देवरी येथे आधारभूत खरेदी योजने अंतर्गत नियमबाह्य धान्य वाहतूक करून तसेच बोगस कागदपत्रे बनवून महामंडळाची फसवणूक केलेली आहे.  गोंदिया जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामामध्ये सन २०१९ व २०२० मध्ये धान्य खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

आणखी वाचा- चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी मागे घ्यावी, काँग्रेस मंत्र्याची मागणी

गडचिरोली येथेही धान्य खरेदी पणन हंगाम सन २०१८-२०२० मध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. बोगस ७/१२दाखवून शेतकऱ्यांचे अनुदान लाटणे, मृत्यू झालेल्या वा शेत जमीन नसलेल्यांच्या नावे अनुदान घेणे, वन विभागाच्या जागेत धान्य शेती लागवड झाल्याचे दाखवून अनुदान उचलणे, इत्यादी गंभीर प्रकार या जिल्ह्यांमध्ये उघडकीस आले आहेत. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात गैरव्यवहाराचे प्रकार झाले आहेत. शेतकऱ्यांशी संबंधीत या संवेदनशील प्रश्नी दोषींना कडक शासन झाले पाहिजे,  अशी स्पष्ट भूमिका विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेत यासंदर्भात सखोल चौकशी व्हावी आणि आरोपींची साखळी जेरबंद व्हावी, यासाठी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात यावे, असे निर्देशे दिले.