दूषित पाण्याचा सर्वाधिक प्रभाव मानवी आरोग्यावर होत असतो. ग्रामीण जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊन दूषित पाण्यामुळे रोगराई होऊ नये यासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत.  त्या अनुषंगाने संपूर्ण रायगड जिल्ह्य़ातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे व पाणीपुरवठा योजनांच्या उपांगांचे अक्षांश व रेखांशनुसार स्थळ निश्चितीकरण (अ‍ॅसेट मॅपिंग) करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा परिषदेमार्फत नागपूर येथील ए.डी.सी.सी. कंपनीच्या मदतीने हे मॅपिंग करण्यात येणार आहे.
यामध्ये जिल्ह्य़ातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची अणुजैविक व रासायनिक तपासणी, अक्षांश व रेखांश काढणे, पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांना सांकेतांक देणे, पाण्यांचे जैविक व रासायनिक असे दोन नमुने घेऊन ते उपविभागीय प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.  तसेच त्या स्रोतांच्या सद्य:स्थितीविषयी नकाशेही तयार केले जाणार आहेत. अशी अनेक कामे जिल्ह्य़ातील एकूण ८२४ ग्रामपंचायतींमध्ये केली जाणार आहेत. या अ‍ॅसेट मॅिपग प्रणालीद्वारे महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम. साळुंके यांनी सांगितले.
जिल्ह्य़ातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या तपासणीची मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी रायगड जिल्हा परिषद, वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट विकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव, जलसुरक्षक व संबंधित कर्मचारी यांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.

अ‍ॅसेट मॅिपग प्रणालीमध्ये हंगामी, बारमाही व बंद असलेल्या जलस्रोतांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामुळे पिण्यायोग्य जलस्रोतांबाबत नागरिकांना माहिती संगणकावर एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तसेच संबंधित संस्थेच्या कार्यप्रणालीवर सनियंत्रण करण्याचे काम भूजल सर्वेक्षण विभाग व जिल्हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण कक्ष करणार आहेत.