सोलापुरातील पोलिस आयुक्तालयाच्या पेट्रोल पंपावरील पाच लाखांची रोकड चोरी केल्याचा संशय असलेल्या सहायक फौजदार मारुती राजमाने यांनी आज (दि.२१) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपाभवानी मंदिराजवळील मुंबई-हैदराबाद उड्डाणपुलाच्या कठड्याला गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही बाब उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक फौजदार मारुती लक्ष्मण राजमाने (वय ५६, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. रविवारी (दि.१८) रात्री पेट्रोल पंपावरील पाच लाखांची रोकड पोलीस मुख्यालयात ठेवण्यासाठी नेत असताना चोरट्यांनी रस्त्यात अडवून चाकूने वार करून पाच लाखांची रोकड असलेली बॅग पळवल्याची फिर्याद राजमाने यांनी दिली होती. याप्रकरणात राजमाने यांच्यावरच पोलिसांचा संशय होता. तपासादरम्यान त्यांच्या घरात एक लाख ८० हजारांची रोकड सापडली होती. त्या नोटांची पडताळणी करण्याचे काम चालू आहे. पोलिस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचले नाहीत, हे प्रकरण नेमके काय आहे हे लवकरच कळेल असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले होते.

राजमाने हे खोटे बोलत असल्याचा संशय पोलिसांना होता. ज्या रस्त्यावरून चोरट्यांनी राजमाने यांचा पाठलाग केल्याचे सांगितले, त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली, मात्र कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात राजमाने किंवा चोरट्यांचे चित्रीकरण झालेले नाही.