विवाहित दांपत्याला पोलिसांनी समेट घडवून आणण्यासाठी बोलावलं पण, प्रकरण शांत होण्याऐवजी एवढं वाढलं की एकमेकांवर थेट तलवारीने वार झाले. पोलिस स्थानकातच दांपत्याचे नातेवाईक भिडले आणि एकमेकांवर तलवार, चाकूने हल्ला केला. हा प्रकार उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये घडला असेल असं तुम्हाला वाटत असेल पण नाही,  मुंबईजवळ उल्हासनगरमधील ही घटना आहे. मध्यवर्ती पोलिस स्टेशनच्या बॅरेकमधील महिला तक्रार निवारण कक्षात मोठा राडा पाहायला मिळाला. या घटनेत १० जण जखमी झाले असून जखमींमध्ये ६ पोलिसांचा समावेश आहे. त्यातही चार महिला पोलीस आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय विकास शिरसाट हा एका खासगी कंपनीत काम करतो. नेहा मुर्तडकर हिच्यासोबत त्याचं गेल्या वर्षीच लग्न झालं, दोघांचा प्रेमविवाह होता. दोघांमध्ये सातत्याने भांडणं होत होती , त्यामुळे पत्नी नेहा काही महिन्यांपासून बदलापूर येथे आपल्या माहेरी राहत होती. विकासने तिला अनेकदा परत बोलावण्याचा प्रयत्न केला पण ती नाही आली. त्यानंतर मदतीसाठी पतीने महिला कल्याण केंद्र गाठलं, येथे दोघांना समुपदेशनासाठी बोलावण्यात आलं. दोघांसोबत त्यांचे नातलगही पोहोचले होते. हेच कारण होतं ज्यामुळे समुपदेशनादरम्यान चर्चा सुरू असताना वादाला सुरूवात झाली. नातलगांपैकी काही जणांकडे तलवार व चाकू होते.

वाद सुरू झाल्यानंतर महिला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांना धक्का देण्यात आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की, शिवीगाळ झाली काहींचे कपडेही फाटले. अखेर बीट मार्शल पोलिस आणि मध्यवर्ती पोलिस स्टेशनमधील कर्मचारी तेथे पोहोचले आणि परिस्थितीवर ताबा मिळवला.

त्यानंतर पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे. समिर चांगले(वय २४), सचिन मुर्तडकर (वय २१), योगेश मुर्तडकर (वय २४), राहुल मुर्तडकर, महेश कर्पे(३६), विकास शिरसाट(२६), आकाश शिरसाट(२४), बंदू शिरसाट (३६) आणि अमोल शिरसाट (२८) यांना अटक करण्यात आली आहे.