चंद्रपूर महापालिकेतील घटना; नगरसेवकांच्या सतर्कतेने प्रकार उघडकीस

चंद्रपूर : महापालिकेच्या कोविड रुग्णालयामध्ये सहा महिन्यांपूर्वी शकुंतला लॉन येथे सुरू केलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलमधील खाटा तथा इतर साहित्य वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, या प्रकाराची काही नगरसेवकांनी तक्रार केल्यानंतर खाटा एका गाडीत भरून परत पाठवण्यात आल्या. या प्रकारामुळे महापालिका प्रशासनावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

मागील वर्षभरापासून करोना महामारी सुरू आहे. या जिल्हय़ात तथा शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संक्रमण जोरात आहे. दररोज बाधितांचा आकडा तथा मृतांची संख्या वाढत आहे. मात्र अशाही परिस्थितीत महापालिकेने स्वत:चे कोविड रुग्णालय सुरू केले नव्हते. महापालिकेवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी टीका केल्यानंतर तथा स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करण्याचा आग्रह धरल्यानंतर व समाज माध्यमांवर सर्वत्र टीका सुरू झाल्यानंतर सव्वादोन कोटी खर्च करून ४५ खाटांचे कोविड रुग्णालय हॉटेल सिद्धार्थ लगतच्या बेघर निवारा इमारतीत सुरू करण्याचा निर्णय महापौर राखी कंचर्लावार तथा आयुक्त राजेश मोहिते यांनी घेतला. त्यानुसार कोविड रुग्णालयाच्या कामाला सुरुवात केली. प्राणवायू, व्हेंटिलेटर, विद्युत सुविधा, फायर ऑडिट ही सर्व कामे तात्काळ पूर्ण केली. दरम्यान, या कोविड रुग्णालयामध्ये खाटांची व्यवस्था करताना सहा महिन्यांपूर्वी शकुंतला लॉन येथे उभारण्यात आलेल्या खासगी जम्बो कोविड हॉस्पिटलमधील खाटांचा पुरवठा केला गेला. विशेष म्हणजे, यासाठी निविदा प्रक्रिया राबवली गेली नाही, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. दरम्यान, हा प्रकार काही नगरसेवकांना माहिती होताच त्यांनी यावर आक्षेप नोंदवत महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. महापालिकेच्या नवीन हॉस्पिटलमध्ये जुन्या जम्बो हॉस्पिटलच्या खाटा वापरल्या जात असल्याची बाब सार्वजनिक झाली. हा प्रकार अंगलट येऊ शकतो, असे निदर्शनास येताच खाटा परत घेऊन जाण्याचे निर्देश देण्यात आले. प्रस्तुत प्रतिनिधीने बेघर निवारा येथे भेट दिली असता एका चारचाकी वाहनात या सर्व खाटा परत नेण्यात येत होत्या. याप्रकरणी अधिक माहितीसाठी महापौर राखी कंचर्लावार यांच्याशी संपर्क साधला असता, कोविड हॉस्पिटलचे काम जवळपास पूर्णत्वाला आले आहे, जम्बो हॉस्पिटलमधील खाटांचा येथे वापर केला काय अशी विचारणा केली असता, याबद्दल माहिती नाही, सविस्तर माहिती घेऊन कळवतो, असे सांगण्यात आले. आयुक्त राजेश मोहिते यांना विचारले असता, शक्यतोवर रविवापर्यंत कोविड रुग्णालय सुरू होईल. जम्बो हॉस्पिटलच्या खाटा वापरण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, बंद पडलेल्या या खासगी जम्बो  कोविड हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या एका अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्याची भागीदारी होती, अशी माहिती तेव्हा समोर आली होती. दरम्यान, यासंदर्भात काँग्रेस नगरसेवक नंदू नागरकर यांना विचारले असता, महापालिकेतील एका जबाबदार अधिकाऱ्यानेच जुन्या खाटा वापरत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. हा प्रकार म्हणजे कोविड रुग्णाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी असले घाणेरडे प्रकार बंद करावेत, यामुळे पालिकेची अधिक बदनामी होत आहे, असे ‘लोकसत्ता’ला सांगितले.

एका वाहनात भरून खाटा परत घेऊन जात असताना.