News Flash

राज्यात ५०० डॉक्टरांना करोनाचा संसर्ग; सायन रुग्णालयातील संख्या सर्वाधिक

खासगी रुग्णालयात डॉक्टरांसाठी ठेवणार राखीव बेड

संग्रहित छायाचित्र

राज्यातील करोना बाधित रुग्णांची वाढत असून, डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनची (आयएमए) आकडेवारी समोर आली असून, यात राज्यात ५०० पेक्षा अधिक डॉक्टरांना करोना झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं आयएमएच्या सदस्यानं दिलेल्या माहितीवरून हे वृत्त दिलं आहे. सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांची संख्या जास्त असून, मुंबईतील सायन रुग्णालयात करोना झालेल्या डॉक्टरांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे, असं म्हटलं आहे.

राज्यात करोनामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. करोना व लॉकडाउनच्या काळात सेवा बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यात राज्यात ५०० पेक्षा अधिक डॉक्टरांना करोनाची लागण झाली आहे. करोनाचं निदान झालेल्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये निवासी डॉक्टरांची संख्या अधिक असून, मुंबईतील सायन रुग्णालयात सर्वाधिक ७० डॉक्टर करोना बाधित झाले आहेत. त्यापाठोपाठ केईएममध्ये ४० डॉक्टरांना, तर नायर रुग्णालयात ३५ डॉक्टरांना संसर्ग झाला होता. ही माहिती महाराष्ट्र निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं दिली आहे.

आयएमएचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडे याविषयी बोलताना म्हणाले,”मुंबईत जवळपास तीन अॅलोपॅथिक डॉक्टरांचा करोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे. तर पुण्यात एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. ही संख्या खूप मोठी आहे. पण, सरकारकडून आम्हाला नावं मिळालेली नाहीत. काही जिल्ह्यामध्ये करोनाचा संसर्ग झालेल्या डॉक्टरांना काही बेड राखीव ठेवण्यासाठी काही खासगी रुग्णालयांनी संमती दिली आहे. मात्र काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे राखीव बेड ठेवण्याला नकार दिला आहे,” असं भोंडे म्हणाले.

मुंबईतील रुग्णालयात त्यांच्या क्षमतेइतके रुग्ण आहेत. तर इतर काही जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांनी डॉक्टरांच्या उपचारासाठी बेड राखीव ठेवण्यास सुरूवात केली आहे. आयएमए या संघटनेचे राज्यात ७५ हजार डॉक्टर सदस्य आहेत. त्यामुळे संघटनेनं खासगी रुग्णालयात करोनाचा संसर्ग झालेल्या डॉक्टरांवर उपचार होण्यासाठी करार करण्याची तयारी सुरू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 2:45 pm

Web Title: at least 500 doctors infected in state says ima bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कोल्हापूर : मुरगुड नगरपालिका मुख्याधिकाऱ्यावर संतप्त नागरिकांकडून चप्पल फेक
2 टोळधाडीवर आता ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवणार; राज्यातील पहिलाच प्रयोग!
3 करोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना ५० लाखांचं विमा कवच
Just Now!
X