19 February 2019

News Flash

सध्या मी काँग्रेसमध्येच, भविष्यातलं सांगू शकत नाही: कृपाशंकर सिंह

मी मुख्यमंत्र्यांना गणरायाच्या दर्शनासाठी बोलावलं होते. माझ्या विनंतीला मान देऊन ते दर्शनासाठी आमच्या घरी आले, असे त्यांनी सांगितले.

कृपाशंकर सिंह (संग्रहित छायाचित्र)

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह हे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू असतानाच कृपाशंकर सिंह यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. सध्या मी काँग्रेसमध्येच आहे, पण भविष्यातलं काही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कृपाशंकर सिंह हे काँग्रेस नेतृत्वावर नाराज असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगली आहे. फेब्रवारीमध्ये बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कृपाशंकर सिंह यांना न्यायालयाने दोषमुक्त केले होते. तेव्हापासूनच कृपाशंकर सिंह हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जोर धरला होता.

गणेशोत्सव सुरु होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर सिंह यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. या दोन्ही नेत्यांमधील चर्चेचे फोटो समोर आल्याने पुन्हा एकदा या चर्चेला बळ मिळाले.

अखेर कृपाशंकर सिंह यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना कृपाशंकर सिंह म्हणाले, सध्या मी काँग्रेसमध्येच आहे. मला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी द्यायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल. भाजपात जाणार की नाही, असे विचारले असता सिंह यांनी थेट उत्तर देणे टाळले. सध्या काँग्रेसमध्येच आहे, भविष्यातलं काही सांगू शकत नाही, असे कृपाशंकर सिंह यांनी सांगितले.

मी मुख्यमंत्र्यांना गणरायाच्या दर्शनासाठी बोलावलं होते. माझ्या विनंतीला मान देऊन ते दर्शनासाठी आमच्या घरी आले. मुख्यमंत्री अन्य पक्षाच्या नेत्यांच्या घरी देखील गेले होते, असे नमूद करत त्यांनी या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले.

 

First Published on September 14, 2018 8:25 pm

Web Title: at present am in congress but dont know about future says kripashankar singh