.. त्यांच्या जीवासाठी गावकऱ्यांनीच जनजागृती केली

मानव-वन्यजीव संघर्ष वाढलेले असतांनाच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सीमेवरील आतेगावच्या गावकऱ्यांनी मात्र वन्यजीव संरक्षणात मोलाची भूमिका बजावली आहे. अस्वल आणि तिच्या दोन पिलांना आसरा देऊन गावकऱ्यांनी जंगल आणि वन्यजीव संवर्धनात मोलाची कामगिरी बजावली आहे. ही कामगिरी पाहून वनाधिकाऱ्यांनी या गावाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सकारात्मक पाऊले उचलली आणि हे गाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेत समाविष्ट केले आहे.

गेल्या २०१५ सालच्या दिवाळीत एका गावकऱ्याकडे गाईच्या गोठय़ात अस्वल आणि तिची दोन पिले आढळून आली. गावकऱ्यांसाठी ही बाब धक्कादायक होती. त्यावेळी ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे अध्यक्ष मनिराम कळपाते, सचिव अन्नाडकोरम, सदस्य वसंत हटवार, ए.डी. मेश्राम व सरपाते यांनी गावात वन्यप्राणी संवर्धनासाठी जनजागृती केली. वन्यप्राण्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केले आणि त्यांनीही साथ दिली. गावकऱ्यांनी गाईच्या गोठय़ातच अस्वल आणि तिच्या दोन पिलांसाठी पिण्याचे पाणी आणि खाण्यासाठी फळे ठेवली, पण अस्वल व तिच्या पिलांनी सुरुवातीला त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. सायंकाळी ते गावाजवळच्याच जंगलात जाऊन बोरे आणि सहद खात होते. ५२ दिवसांनी मादी अस्वल आणि तिची पिले गावातून जंगलात कायमचे निघून गेले. जोपर्यंत अस्वल आणि तिची पिले गोठय़ात होती, तोपर्यंत गावकऱ्यांनी त्यांची काळजी घेतली. ते जंगलात निघून गेल्यानंतर गावकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. जंगल आणि वन्यप्राणी संवर्धनात सहभागी झाल्यामुळे हे गाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेत समाविष्ट करण्यात आले. वनखात्यातर्फे पुरवण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस जोडणी, सौर कुंपण, पाठदिवे, स्वच्छता गृह, तसेच गावातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनाखाली वनखात्याने सूक्ष्म योजना तयार करून गावाच्या विकासासाठी शिस्तबद्ध पद्धतीने योजना राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, नवेगाव-नागझिराचे क्षेत्र संचालक रवीकिरण गोवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांची यात मोलाची भूमिका आहे. आतेगावच्या या कामगिरीमुळे आता इतर गावांनीसुद्धा जंगल व वन्यजीव संवर्धनात सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे.

साकोली तालुक्यातील आतेगावच्या २४० कुटुंबांपैकी १९१ कुटुंबे एलपीजी गॅस जोडणीधारक आहेत. त्यामुळे जंगलावरील भार कमी झाला आहे. ५० कुटुंबांना माफक दरात स्वच्छतागृहे तयार करून दिले आहे. ग्राम परिस्थितीकीय विकास समितीच्या २० शेतकऱ्यांनी गावातील १९ एकरावर सेंद्रिय शेतीसाठी उत्स्फूर्त भात लागवड केली आहे. दोन शेतकरी मशरूम उत्पादन घेत आहेत. दोन तरुण जिप्सी चालवत आहेत, तसेच इतर युवक-युवतींना वनखात्याकडून विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे.