औरंगाबादमध्ये एटीएम मशीन घेऊनच चोरांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे. या मशीनमध्ये २२ लाख ७७ हजार रुपये होते. बीड बायपास जवळ असलेल्या दत्त मंदिराजवळ असलेल्या एटीएम केंद्रात ही घटना घडली. बीड बायपास हा वर्दळीचा आणि गजबजलेला रस्ता आहे. याच रस्त्यावर जे स्टेट बँकेचे एटीएम आहे तिथे ही घटना घडली आहे. एटीएमच्या परिसरात व्यापारी संकुल आणि एक मंगल कार्यालयही आहे. या एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक नसतो. शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी अख्खे एटीएम मशीनच उचलून नेले.

शुक्रवारी दुपारीच या मशीनमध्ये रक्कम भरण्यात आली होती. सुरक्षा रक्षक नसलेल्या एटीएममध्ये चोरी झाल्याने चोरट्यांनी पाळत ठेवूनच हा कट आखला गेला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पोलीस याप्रकरणी आरोपींनी शोधत आहेत.

 

एटीएम सेंटरमधून चोरण्यात आलेल्या मशीनला वीजेची जोडणी आणि इंटरनेट कनेक्शनची केबल लावलेली होती. एटीएम मशीन उचलून घेऊन जाऊ नये म्हणून हे मशीन भिंतीला नटबोल्टच्या मदतीने जोडण्यात येत असते. तसे इथे झालेले नव्हते. त्याचमुळे या ठिकाणी पाळत ठेवून चोरी करण्यात आली आहे असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस या प्रकाराचा शोध घेत आहेत.