पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आत्मनिर्भर भारत योजना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारधारेचा भाग आहे, भाजपही याच विचारातून पुढे जात आहे, असे मत माजी मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

शहर भाजपच्या वतीने आज, शनिवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावेडीच्या जॉगिंग पार्कवर अभिवादन, वृक्षारोपण, रुग्णवाहिकेच्याा लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन माजी मंत्री तावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या प्रसंगी रा. स्व. संघाचे पश्चिम प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, माजी मंत्री राम शिंदे, माजी खासदार दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी आमदार चंद्रशेखर कदम, उपमहापौर मालन ढोणे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आदि उपस्थित होते.

या वेळी प्रांत संघचालक जाधव यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक महेंद्र गंधे यांनी केले. सूत्रसंचालन शारदा होसिंग यांनी केले तर आभार तुषार पोटे यांनी मानले.