भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारावर  शुक्रवारी रात्री औरंगाबाद एटीएस, लातूर पोलिस आणि दूरसंचार विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात पोलिसांनी एकूण ४ लाख ६० हजार रूपयांच्या वस्तू जप्त केल्या. यावेळी पोलिसांनी दोन कॉल सेंटर चालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणावर सीमकार्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे समजते. त्यांचा आंतराष्ट्रीय रॅकेटशी संबंध असल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्ते करण्यात येत आहे. या बोगस कॉलसेंटर्समुळे दूरसंचार विभागाला आजवर तब्बल १५ कोटींच्या महसूल बुडाल्याचं सांगितलं जात आहे.

पोलीस सूत्रांनी दलेल्या माहितीनुसार, या बोगस कॉलसेंटर्सच्या माध्यमातून बेकायदा पद्धतीने आंतरराष्ट्रीय कॉल्स हाताळण्यात येत असत. याबाबत अधिक तपास केल्यानंतर शहराच्या प्रकाश नगर, आणि नंदी स्टॉप भागातून सर्वाधिक कॉल केले गेले असल्याचं निदर्शनास आले. या माहितीच्या आधारावर औरंगाबाद एटीएसने लातूर पोलिसांना सोबत घेत सुरूवातीला प्रकाश नगर येथेली बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला. येथील कारवाईत पोलिसांनी ९६ सिमकार्ड, एक कम्प्युटर, सीपीयू, ३ अनधिकृत कॉल ट्रान्सफॉर्मिंग मशिन्स जप्त केल्या. गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी अनधिकृतरित्या हे कॉलसेंटर चालवत असल्याचंही समोर आलं. यावेळी दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या आरोपींची नावे पोलिसांकडून गुप्त ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत वालनवाडी येथेही अशाचप्रकारचे कॉलसेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली. याठिकाणी कारवाई केल्यानंतर पोलिसांनी दोन बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय गेटवे, १४ सिमकार्ड आणि १ लाख २० हजार इतक्या किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या. यावेळी एक २७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल ६४ सिमकार्ड, एक लॅपटॉप, २ आंतरराष्ट्रीय गेट-वे मशिन्स आणि दीड लाख रुपयांचं एक मशिन असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अमेरिकी नागरिकांना गंडा घालणाऱ्या मीरारोडमधील बनावट कॉल सेंटरच्या मास्टरमाईंडला अटक

हे आरोपी आंतरराष्ट्रीय कॉल अनधिकृत गेटवेच्या साहाय्याने लोकल लाइनवर वळवायचे. एखाद्या गुप्त माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी लष्कराकडून अशाप्रकारच्या कॉल्सचा वापर केला जातो. त्यासाठी आरोपींनी एक अॅप्लिकेशन बनवले होते. मोबाईल कंपन्यांना या कॉल्सबद्दलची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे त्यासाठी कोणताही चार्ज लागत नव्हता. ही बाब गुप्तचर विभागाच्या लक्षात आली. त्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. मात्र, येथून कोणाला कॉल  करण्यात येत होते ? कशासाठी करण्यात येत होते ? या सगळ्यामागे कोणाचा हात आहे ? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

आमच्या मुलांना याची कल्पनाच नव्हती!