करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णालयात नोकरी करण्यास विरोध करीत रुग्णालय कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. सोलापूर जिल्ह्य़ात बार्शी तालुक्यातील सौंदरे येथे असाच प्रकार घडला. यात तिघांनी केलेल्या हल्ल्यात एक आरोग्य कर्मचारी गंभीर जखमी झाला. सुजित उत्तरेश्वर कुभारे (वय ३१, रा. सौंदणे) हे बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात नोकरी करतात.  बार्शीत रुग्णालयात सेवा बजावून दुचाकीने गावात परतले. ते घराकडे परत आले असता त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या विजय मच्छिंद्र अवधूत याने कुभारे यांना हटकले. सध्या सर्वत्र करोना विषाणू फैलावला आहे, तुम्हीसुद्धा बार्शीत रुग्णालयात नोकरीवर जाऊ  नका. तेव्हा कुभारे यांनी हा गैरसमज दूर करण्याचा आणि विजय अवधूत यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे संतापलेल्या विजय अवधूत याने कुभारे यांच्यावर हल्ला केला.