प्रार्थनेसाठी जमलेल्यांवरील हल्लाप्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही

कोल्हापूर : खासगी जागेत प्रार्थनेसाठी जमलेल्यांवर अज्ञात टोळक्याने हल्ला केल्याला तीन दिवस उलटल्यानंतरही कोवाड (ता. चंदगड) गावात भय, संशय आणि अनभिज्ञतेचे वातावरण आहे. हल्लय़ाने बिथरलेले उपासक भीतीच्या छायेत आहेत. धर्मपरिवर्तनाचे काम होत असल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा संशय ग्रामस्थांच्या बोलण्यातून जाणवत असला, तरी त्याचे पुरावे ते देऊ  शकत नाहीत. उपासकांच्या प्रमुखाने धर्मपरिवर्तनाचा प्रकार होत असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

या प्रकरणी पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक तपास करीत असले तरी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची ओळख आणि गुन्ह्यचा हेतू या दोन्हीचा उलगडा होईल, असे पोलीस उपाधीक्षक अनिल कदम यांनी बुधवारी सांगितले.

कोवाड हे चंदगडपासून तीस किमी अंतरावर असलेले गाव. लोकसंख्येची नोंद चार हजार. पण आजूबाजूच्या लोकांनी आपला मुक्काम येथे केल्याने वस्ती आठ हजारच्या आसपास. भात शेतीचे रूपांतर आता उसाच्या मळ्यात झाल्याने संपन्नता आलेल्या या गावाने बाळसे धरले आहे.  ‘श्रीमान योगी’ ‘स्वामी’कार  रणजित देसाई यांच्यामुळे गावाची ओळख दृढ झाली. माधवी देसाई यांनी गावाला सुधारणेच्या वाटेवर आणून ठेवले. असे हे कोवाड गाव रविवारी खासगी जागेत प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांवर झालेल्या जीवघेण्या हल्लय़ामुळे संभ्रम आणि विचारात पडले आहे. हिरण्यकेशी काठ ढवळून निघाला आहे.

धर्मपरिवर्तन नव्हे उपासना

कोवाडमध्ये सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने राहणारे. गेला रविवार मात्र त्याला छेद देऊन गेला. गावच्या मुख्य भागापासून काही अंतरावर सुमित्रा दशरथ जाधव यांचे दुमजली घर. त्याच्या तळमजल्यावर भीमसेन गणपती चव्हाण (वय ३६) हे पत्नीसह राहतात. त्यांनीच चंदगड पोलिसात हल्लय़ाची फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी स्वत:ला हिंदू असल्याचे  म्हटले आहे. भीमसेन हे आपण समाजकार्य करतो असे म्हणतात. समाजकार्याबद्दल विचारले असता  ते म्हणाले की ‘मी लोकांना सरळमार्गी जीवन कसे जगायचे याचे समुपदेशन करतो. त्याची उपासना लोकांकडून करवून घेतो. त्यात धार्मिक असे काही नाही. मात्र, उपासनास्थळी येशूंची प्रतिमा कशासाठी असे विचारले असता येशूंद्वारे आम्हाला  शांती मिळत असल्याने प्रतिमा ठेवून मार्गदर्शन करतो,असे उत्तर देतानाच धर्मातराचे काम केले जात असल्याचा मुद्दा त्यांनी फेटाळून लावला. हल्ला कोणी नि का केला याचे कारण माहीत नसल्याचे सांगत भीमसेन यांनी पोलीस तपासाकडे बोट दाखवले.

घरमालक प्रवीण जाधव हे पुणे येथे उच्चपदावर नोकरी करतात. घडल्या प्रकाराबद्दल प्रश्न उपस्थित केला असता जाधव यांनी सांगितले, भाडय़ाने दिलेल्या जागेत चर्च सुरू करण्यात आलेले नाही तर ते उपासनस्थळ आहे. २००६ पासून ते सुरू असले तरी वादाचा प्रकार कधी घडला नाही, असे त्यांनी सांगितले. अंतर्गतरीत्या धर्मपरिवर्तन केले जात असल्याचा लोकांमध्ये समज असला तरी त्याची सत्यता मला माहीत नाही. प्रार्थना चालते हे मात्र खरे आहे.

‘संशयितांना लवकरच अटक’

या घटनेची गंभीर नोंद पोलिसांनी घेतली आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलिसांची ५-६ पथके कोवाड परिसरापासून ते सीमाभाग, बेळगावपर्यंत संशयितांचा शोध घेण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत. बुधवारी कोल्हापुरात बोलताना पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले ‘मागील तीन दिवस पोलिसांनी कसून तपास करून सीसीटीव्ही फुटेज आधारे संशयितांची नावे मिळवली आहेत. लवकरच त्यांना अटक होईल. हल्लेखोर पोलिसांच्या टप्प्यात आहेत.’

उपासनेच्या नावाखाली धर्मपरिवर्तन?

या जागेत उपासनेच्या नावावर धर्मपरिवर्तन केले जात असल्याचा संशय गावकरी व्यक्त करतात. केवळ उपासना केली जात असती तर वाद, मारहाण कशाला झाली असती. तसे काही होत असल्याच्या रागातून हल्ला झाला असावा असेही काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दुसरीकडे इतका मोठा प्रकार घडला असताना गावातील बव्हंशी लोक याबाबत अनभिज्ञ आहेत. तर काही जण नेमका हा प्रकार काय आहे याबाबत संभ्रमित असल्याचे दिसून आले.