रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनातून डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीला ग्रामस्थांनी पकडले. मात्र यातील एका आरोपीने कार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर शस्त्राने हल्ला केला. नंतर कार घेऊन पळून जाताना जमावातील एकाला जबर धडक दिल्याने त्याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत श्रीरामपूर येथून चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
शहरानजीकच्या रायतेवाडी फाटय़ाजवळच्या बाह्यवळण मार्गावर उभ्या असलेल्या एका टेम्पोच्या टाकीतून काही लोक डिझेल चोरी करत असल्याचे एका मालमोटार चालकाच्या लक्षात आले. त्याला हटकल्याने अक्षय खुळे व राजू भालेराव यांना लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. घटना लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी चौघा चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत तिघे पसार झाले. तर एक जण त्यांनीच आणलेल्या कारमध्ये बसून राहिला. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक अन्सार इनामदार, संदीप तागड, अनिल पाटोळे, दशरथ वायख, प्रसाद लावर, विष्णू आहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस पोहोचले त्या वेळी गावकऱ्यांनी पकडलेला आरोपी कारमध्ये बसून होता तर कारची चावी काढून घेण्यात आली होती. पोलीस पकडतील म्हणून आरोपीने गाडीतील वायर जोडून कार चालू केली. आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसताच उपनिरीक्षक इनामदार यांनी खिडकीतून हात घालत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपीने इनामदार यांच्या हातावर शस्त्राने वार केल्याने त्यांच्या तावडीतून तो सुटला. जमलेल्या गर्दीतील अनेक दुचाकी व माणसांना धडका देत बेदरकारपणे त्याने कार दामटली. यात गडबडीत सोमनाथ जयराम मांडेकर यांच्या अंगावरून गाडी घालण्याचा प्रयत्न केला. आरोपी कार घेऊन पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी मांडेकर यांना रुग्णालयात हलविले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त अधीक्षक सुनीता साळुंखे, निरीक्षक श्याम सोमवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेची माहिती घेताना त्यांना संबंधित कारची कागदपत्रे मिळाली. त्याआधारे तपास करत पोलीस श्रीरामपूरला पोहोचले तेथील देवेंद्र रामसिंग गौतम, संदीप बायजी बिंद व सोनू उन्नर िबद यांना अटक केली. अटक केलेला चौथा आरोपी सुनील वसंत सुर्वे हा ग्रामस्थांच्या मारहाणीत जखमी झाल्याने त्याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.