करोनाचा वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांना नियम पाळण्याचं वारंवार आवाहनही केलं जात आहे. मात्र, तरीही नियमांची पायमल्ली होत असल्याचं चित्र राज्यात दिसत आहे. गर्दी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात असून, संगमनेरमध्ये पोलिसांवरच हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेचे राज्याच्या राजकारणात पडसाद उमटले असून, भाजपानं ठाकरे सरकारवर निशाणा साधला. “महसूलमंत्र्यांच्या संगमनेर शहरात या राज्यात नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांनी कर्तव्य बजावणे हा त्यांचा गुन्हा आहे का?,” असा सवाल भाजपाने केला आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

“राज्यकर्त्यांनो, पोलिसांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान मानता ना? मग या महाराष्ट्रात, दररोज महाराष्ट्राचा अपमान होत आहे. दिवसागणिक पोलिसांवर हल्ले होत आहेत, भर दिवसा पोलिसांचे मुडदे पाडले जात आहेत, महाराष्ट्राची मान अपमानाने आणि शरमेने झुकत आहे, आणि तुम्ही मात्र मूग गिळून गप्प बसला आहात. कुठे गेली तुमची अस्मिता?” असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

“संगमनेरमध्ये गर्दी करू नका सांगणाऱ्या पोलीसावर जमावाने काल हल्ला केला. पण अजूनही पोलीसांचा अपमान झाल्याचा साक्षात्कार संजय राऊत यांना कसा झाला नाही? हल्लेखोर कोण पाहून टोपी फिरवली की काय?” असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.

“पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत या बंद खोलीत कॅमेऱ्यासमोर केलेल्या घोषणा एवढ्यातच कसे विसरलात? धोरणलकवा आणि निर्णयलकव्यात गुरफटलेले सरकार पोलिसांना संरक्षण देणार की त्यांच्यावर होणारे हल्ले षंढपणाने पाहात बसणार? महसूलमंत्र्यांच्या संगमनेर शहरात या राज्यात नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांनी कर्तव्य बजावणे हा त्यांचा गुन्हा आहे का? संगमनेरमध्ये पोलिसांनी अजूनही कठोर कारवाई केली नाही. नवाब मलिक तुमचे गृहखाते टोपी पाहून कारवाईचा निर्णय घेते का? संगमनेरातील गुन्हेगारांवर कारवाईच्या नावाखाली पांघरूण घालण्याचे षडयंत्र रचले जाणार असेल तर त्याचा जाब सत्ताधाऱ्यांना द्यावा लागेल. संगमनेरमध्ये कोरोना नियमांचे धडधडीत उल्लंघन झाले तरी कारवाई कोठे ? नानाजी पटोले तुम्ही बाळासाहेब थोरातांचे गाव म्हणून गप्प बसलात काय ?” असे केशव उपाध्ये  यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या बुधवार पेठेत तडीपार गुंडाने पोलीस हवालदाराचा निर्घृण खून केला. पोलीस दल हादरले, पण गृहखाते ढिम्म आहे. दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातच फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एका तडीपार गुंडाने पोलिसांवर कोयत्याने हल्ला चढविला. पोलिसांचे मनोबल खच्ची करणाऱ्या अशा गुंडगिरीला जबाबदार कोण? अशी टीका करत केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.