News Flash

बीड जिल्ह्यात दोन ठिकाणी पोलिसांवर हल्ला

गुन्हा दाखल; जखमी पोलिसांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

प्रतिकात्मक छायाचित्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीचे आदेश असताना दुकान सुरू का ठेवले ? असा जाब विचारणाऱ्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला यात दोन पोलीस जखमी झाल्याची घटना नाकलगाव (ता.माजलगाव, जि. बीड ) येथे शनिवारी घडली. तर आष्टी शहरात तोंडाला मास्क न बांधता बाजारपेठेत फिरणाऱ्यास मज्जाव केल्याचा राग मनात धरून दोघांनी काठीने मारहाण करून तीन पोलिसांना जखमी केले. दोन्ही घटनेतील जखमी पोलिसांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना टाळेबंदी काळात शनिवारी नाकलगाव ( ता. माजलगाव ) येथे मटनाचे दुकान  सुरु असल्याचे आढळून आले. यामुळे पोलीस कर्मचारी विशाल मुजमुले व आकाश जाधव यांनी दुकानदारास जाब विचारत दुकान बंद करण्यास सांगितले. मात्र, या दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा राग धरून दुकानदाराने 20 ते 25 जणांचा जमाव जमवत दोन्ही पोलिसांवर हल्ला चढवला. यावेळी आरडाओरडा झाल्याने काही ग्रामस्थ धावले व पोलीस कर्मचाऱ्यांना बाजूला घेतले यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिस कर्मचारी विशाल मुजमुले यांच्या कानातून तर आकाश जाधव यांच्या डोळ्यातून रक्तस्राव होत असल्याने त्यांना बीड येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिंद्रुड पोलिस स्टेशनला भेट दिली. अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक श्रीकांत ढिसले यांनी घटनास्थळी भेट दिली. दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याचप्रमाणे आष्टीतही शनिवारी सकाळी  तोंडाला मास्क न लावता बाजारात जाणाऱ्या तरुणांना कमान वेशीजवळ बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी रोखले असता तीन तरूणांनी काठीने पोलीसांवरच हाल्ला चढवला यात पोलिस सचिन कोळेकर, रियाज पठाण व होमगार्ड शैलेश वांढरे हे जखमी झाले. डोक्यात काठीचा मार लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शांतीनाथ राजाराम फुंदे (वय 40) व शरद राजाराम फुंदे (वय 45, दोघे रा. शेकापूर, हल्ली मुक्काम पुणे) यांच्या विरुद्ध रियाज पठाण यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा तसेच राष्ट्रीय आपत्ती कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 3:53 pm

Web Title: attack on police two places in beed district msr 87
Next Stories
1 मटका किंग रतन खत्री यांचे निधन
2 Lockdown: मजूरांसह यात्रेकरु, विद्यार्थ्यांनाही मोफत एसटी प्रवासाची सुविधा द्या – सुधीर मुनगंटीवार
3 विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर; सातारा, अकोल्यातील नेत्यांना संधी
Just Now!
X