शेतवाटणी, ऊस व जनावरांचा गोठा पेटविल्याचा जाब विचारणाऱ्या पित्यास मुलाने धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे बुधवारी हा प्रकार घडला. बेंबळी पोलिसांनी आरोपीस अटक केली.
बेंबळी येथील तुराबखाँ सल्लारखाँ पठाण (वय ५०) यांचा मुलगा महेबूब पठाण मागील अनेक दिवसांपासून शेती वाटून द्या, असा हट्ट धरीत होता. तुराबखाँ पठाण यांनी तुझ्या इतर भावांचे लग्न झाल्यानंतर सगळय़ांना एकदाच जमीन वाटून देतो, आताच जमीन वाटून देणार नाही, असे सांगत शेतीची वाटणी करण्यास टाळाटाळ करीत होते. याचा राग मनात धरून महेबूबने शेतात लावलेला ऊस व जनावरांचा गोठा अक्षरश: पेटवून देऊन हजारो रुपयांचे नुकसान केले. त्यामुळे संतप्त झालेले तुराबखाँ पठाण यांनी मुलगा महेबूब यास बुधवारी सकाळी बाजार चौकात गाठून याचा जाब विचारला. या वेळी दोघांमध्येही शिवीगाळ, बाचाबाची व किरकोळ हाणामारी झाली. रागाच्या भरातच महेबूबने कात्री आणून तुराबखाँ यांच्या मानेवर व पोटावर सपासप वार करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत तुराबखाँ गंभीर जखमी झाले. त्यांना उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेनंतर महेबूब पठाण हा आत्महत्या करतो, असे म्हणून तेथून निघून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यास ताब्यात घेतले.