रेणापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम पटवारी यांना त्यांच्या कक्षात घुसून गुरुवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास संभाजी सेनेच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले व चाकूने हल्ल्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यात पटवारी यांनी तक्रारीत असे म्हटले, आहे की कार्यालयीन कक्षात पूर्वपरवानगी न घेता दहा-पंधरा जण अचानक घुसले व त्यांनी आम्ही संभाजी सेनेचे कार्यकत्रे आहोत, आम्हाला २ लाख रुपये द्या, अशी मागणी केली. पसे देण्यास नकार दिल्यानंतर सोबत आणलेल्या बाटलीतील काळी शाई माझ्या तोंडावर व कपडय़ावर टाकली. त्यातील एकाने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो वार माझ्या सहकाऱ्याने अडवला. माझ्या हातातील सोन्याच्या दहा ग्रॅमच्या दोन अंगठय़ा, गळय़ातील १५ गॅ्रमची चेन व खिशातील अंदाजे ५ हजार ५०० रुपये बळजबरीने काढून घेतले तसेच माझा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आलेले कार्यकत्रे पळून जात असताना त्यातील दोघांना कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पकडून ठेवले व पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
दोनच दिवसांपूर्वी लातूर तहसीलदारांवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर जिल्हय़ात ही दुसरी घटना घडली आहे. या घटनेचा महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेने निषेध केला असून शुक्रवारी सर्व जण काळय़ा फिती लावून कामकाज करणार आहेत.