लातूरचे तहसीलदार महेश शेवाळे हे सोमवारी आपल्या कार्यालयाच्या आवारात गाडीतून उतरत असताना त्यांच्यावर चाकूहल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या धोंडिराम भद्रे (वय ७४) यांना अटक करण्यात आली आहे.
धोंडिराम भद्रे हे लातूर तालुक्यातील शिराळा गावचे शेतकरी. गेल्या सात वर्षांपासून आपल्या जमिनीला जाणारे रस्ते तहसीलने बंद केल्यामुळे ते उपोषण, आंदोलन, न्यायालयीन लढा देत आहेत. आपली पत्नी, दोन मुले, विधवा सून यांचा सांभाळ ते मजुरी करून करत आहेत. आपल्या प्रश्नाला न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी वैतागून तहसीलदारांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने शेवाळे यांना जखम न होता हातातील डायरीवर वार झाला. धोंडिराम भद्रे यांना तातडीने ताब्यात घेण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात रीतसर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी तहसीलदार महेश शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता, २००३पासून संबंधित शेतकरी रस्त्यासाठी मागणी करतो आहे. त्याची मागणी चुकीची असल्यामुळे सर्वच ठिकाणी त्याच्या विरोधात निकाल गेला. सध्या आपल्यासमोर त्याचा कोणताही अर्ज नव्हता. तहसीलकडून कसलेही प्रकरण प्रलंबित नव्हते. आपल्यावरील हल्ल्याचा प्रकार धक्कादायक असल्याचे ते म्हणाले.