शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर केलेल्या हल्ल्यामुळे ठाकरे सरकारला भाजपाने टार्गेट केलेलं असताना काँग्रेसने भाजपाला एका जुन्या प्रकरणावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात फडणवीस सरकारच्या काळात भाजपाच्या खासदारानं एका जवानाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे हा आरोप केला असून या प्रकरणाबाबतच्या तक्रार अर्जाची प्रतही त्यांनी प्रसिद्ध केली आहे. सावंत यांनी म्हटलं आहे की, “जवान सोनू महाजन यांच्यावर चाळीसगावचे खासदार उन्मेश पाटील यांच्या सांगण्यावरुन जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी तक्रार दाखल करुनही अद्याप खासदार पाटील यांना पोलिसांनी अटक का केली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार या माजी सैनिकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

सावंत दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतात, “सन २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात चाळीसगावचे भाजपाचे खासदार उन्मेश पाटील यांच्या सांगण्यावरुन माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. पाटील यांची तक्रारही पोलिसांनी दाखल करुन घेतली नसल्याने अखेर त्यांच्या कुटुंबांना गुन्हा नोंदवण्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागली होती. मात्र, भाजपाने आपल्या या खासदाराविरोधात अद्यापही कारवाई केलेली नाही.”

“मुंबईला बदनाम करण्याचा डाव”

सचिन सावंत यांनी महाजन कुटुंबियांनी दाखल केलेल्या एफआयआरची कॉपी ट्विटरवरुन शेअर केली आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी निवेदन ट्विटरवर प्रसिद्ध करुन माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाणीवर ती शिवसैनिकांची उत्स्फुर्त आणि संतप्त प्रतिक्रिया होती असं म्हटलं आहे. तसेच यावरुन होत असलेलं राजकारण हे मुंबईला बदनाम करण्याचा डाव असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मारहाण झालेल्या नौदल अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.