नदीपात्रात फळ्या टाकल्या, पुणतांबे येथे ठिय्या आंदोलन, आंदोलकांचा जलसमाधीचा इशारा

श्रीरामपूर : जायकवाडीला सोडलेले पाणी गोदावरी नदीपात्रातील बंधाऱ्यात फळ्या टाकून अडविण्यात आले. आता पोलीस बंदोबस्तात या फळ्या काढण्यास जलसंपदा विभागाने सुरुवात केली असून सात बंधाऱ्यातील फळ्या काढण्यात आल्या आहेत. मात्र पुणतांबे (ता.कोपरगाव), नाऊ र व सराला (ता. श्रीरामपूर) येथील बंधाऱ्यावर शेकडो गावकऱ्यांनी महिलांसह ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आंदोलकांनी जलसमाधीचा इशारा दिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणसमूहातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले. मुळा, गोदावरी व दारणा धरणातून जायकवाडीला पाणी गेले. मात्र नदीपात्रात गावकऱ्यांनी पाणी अडविले. त्याचा पंचनामा करण्यात आला. हे पाणी सोडून देण्याचा आदेश जलसंपदा विभागाने काढला. आज गोदावरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोपरगाव तालुक्यातील बंधाऱ्यांच्या फळ्या काढल्या. खेडले, वडगाव, मंजूर, माहेगावदेशमुख, हिंगणी, सडे व डाऊ च या बंधाऱ्यातील फळ्या काढून पाणी सोडून देण्यात आले.

या वेळी सडे येथे खासदार सदाशिव लोखंडे यांनी विरोध केला. मात्र प्रांताधिकारी ठाकरे यांनी त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली. त्यानंतर ते निघून गेले.

बंधाऱ्याच्या फळ्या काढतांना मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक, ७ पोलीस निरीक्षक, अडीचशे पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा, दोन दंगल नियंत्रण पथके त्याकरिता तैनात करण्यात आली होती. हा बंदोबस्त उद्या शनिवारी आणखी वाढविण्यात येणार आहे.

गोदावरी नदीपात्रातील आणखी पाच बंधाऱ्यातील फळ्या काढण्यात येणार आहेत. मात्र पुणतांबे (ता.कोपरगाव), नाऊ र व सराला (ता.श्रीरामपूर) या बंधाऱ्यावर हजारो गावकऱ्यांनी महिलांसह ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. बंधाऱ्यावरच मंडप टाकून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रंदिवस गावकऱ्यांनी पहारा ठेवला असून पाणी जाऊ  देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पुणतांबे व सराला येथे खासदार लोखंडे, अविनाश आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, संतोष कांबळे यांनी भेट देऊ न आंदोलनास पाठिंबा दिला. तर माजी आमदार दौलतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक घेऊ न अडविलेले पाणी सोडण्यास विरोध करण्यात आला. वरच्या भागात जरी

फळ्या काढण्यात आल्या तरी खालच्या भागात मात्र विरोध सुरु झाला आहे.

प्रवरा नदीपात्रातील फळ्या उद्या शनिवारी काढण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. मुळा नदीपात्रातील बंधाऱ्यांच्या फळ्याही काढण्यात येणार आहेत. भंडारदरा धरणातून सध्या पाणी सुरु आहे. त्यामुळे तूर्तास जलसंपदा विभागाने सावध भूमिका घेतली आहे. मात्र नदीकाठच्या भागात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

मराठवाडा,नगर—नाशिक एकत्र

गोदावरी नदीपात्रातील बंधाऱ्यातील फळ्या काढण्यास मराठवाडय़ातील वैजापूर व गंगापूरच्या शेतकऱ्यांनीही विरोध दर्शविला आहे. गोदावरी नदीकाठच्या कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बंधाऱ्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले असता त्यात वैजापूर व गंगापूरचे शेतकरीही सहभागी झाले आहेत. आज बंधाऱ्यावर भजन व कीर्तन सुरु करण्यात आले आहे.