पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे एका नवजात अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परंतु सुदैवाने त्या ठिकाणी काही शेतकरी गेल्याने संबंधित तरुण पळून गेले. दोन दिवसांच्या लहान मुलाला या ठिकाणी काही तरूणांकडून पुरण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, पोलिसांनी बाळाला सुरक्षितपणे जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबोडी येथील शेतामध्ये दोन तरुण खड्डा खणत होते. तेव्हा या परिसरातील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना संशय आला त्या ठिकाणी येऊन लांबूनच त्यांनी तुम्ही काय करत आहात, कशाला खड्डा खणत आहात अशी विचारणा केली. परंतु त्यावेळी घाबरून त्या दोन तरुणांनी त्यांच्या दुचाकीवरून पळ काढला. मात्र, जाताना ते अर्भक तिथेच सोडून दिले. यानंतर या शेतकऱ्यांनी सासवड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी .एस .हाके तातडीने घटनास्थळी आले. तेव्हा त्यांना हे दोन दिवसाचे अर्भक तेथे दिसून आले. जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून या अर्भकाला पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवले जाणार आहे. सासवडचे पोलीस निरीक्षक डी .एस .हाके या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.