जागेच्या वादातून झालेल्या भांडणात स्वत:च्या आईचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय सावस्कर यांच्याविरूध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र नंतर याबाबतची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित वृद्ध महिलेने पोलिसात अर्ज दाखल केला असून त्यावर योग्य चौकशी होऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
सोनूबाई नामदेव सावस्कर (७८, रा. रेल्वे लाईन्स, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा मंगेश याने त्यांच्याबरोबर जागेच्या वादातून भांडण केले होते. त्याची कैफियत कानावर घालण्यासाठी सोनूबाई ज्येष्ठ पुत्र डॉ. विजय सावस्कर यांच्याकडे गेल्या असता त्यांनीही चिडून आईशी भांडण काढले व रागाच्या भरात तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या गुन्ह्य़ाचा तपास पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र राठोड करीत आहेत.
तथापि, ही फिर्याद दाखल झाल्यानंतर थोडय़ाच वेळात पुन्हा सोनूबाई सावस्कर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली फिर्याद मागे घेण्याबाबतचा अर्ज सादर केला. यासंदर्भात चौकशी होऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. तर डॉ. विजय सावस्कर यांनी, दोन वर्षांपूर्वी आपले वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आईची मानसिक स्थिती बिघडली. ती चार महिन्यांपासून भावाकडे राहते. भावाच्या दबावाखाली गैरसमजुतीने आईने पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली होती. ती आता मागे घेतल्याचे स्पष्ट केले. सावस्कर कुटुंबीय प्रतिष्ठित समजले जात असून केवळ मालमत्तेच्या कारणावरून गृहकलह होऊन त्याची परिणती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यापर्यंत झाल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.