नांदेड : देगलूर तालुक्यातील सध्या शासनाने बंदी घातलेल्या घाटातून दररोज रात्रीच्या वेळेला छुप्या मार्गाने वाळू तस्करांकडून मोठय़ा प्रमाणात वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानंतर तहसीलदारांनी आपले दोन सहकारी व खासगी दुचाकी राठोड पेट्रोल पंपासमोर थांबवून समोरून वाळूने भरगच्च भरून येत असलेल्या वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन वाळू तस्करांसह चालकाने मिळून तहसीलदारांसह वाहनावर पेट्रोल टाकून जाळ लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शहरातल्या मुख्य रस्त्यावरच १९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.  पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

वाळूचा अवैध रीतीने उपसा व वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्याने १९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तहसीलदार अरिवद बोळगे यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांसह खासगी दुचाकीने नांदेड-हैदराबाद रोडवरील राठोड पेट्रोल पंपासमोर उभे राहून वाळूने भरलेले वाहन (एमएच२६-एडी६७८२) थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनचालकाने वाहन न थांबवता भरधाव जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला मोठय़ा प्रयत्नाने थांबविले. तेव्हा वाहनचालकाने भ्रमणध्वनीवरून शेख अहेमद व सिद्दीबाबा सिद्दी खाजा यांना बोलावून घेतले. ते दोघे येताच वाहनचालकासह तिघांनी तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मोठा धिंगाणा घालत तहसीलदारासह वाहनावर पेट्रोल टाकून जाळ लावा आणि जिवे मारा असे म्हणत गोंधळ घातला. तेव्हा या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक द्वारकाद्वास चिखलीकरासह पोलिस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. दोन आरोपींना अटक केली व एक फरार आहे.

तहसीलदार अरिवद बोळंगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख अहेमद व सिद्दीबाबा सिद्दी खाजासह वाहन चालकाविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक परगेवार करीत आहेत.