जिल्हा सहकारी बँकेच्या १९ जागांसाठी ५ मे रोजी मतदान होणार आहे. चार दिवसांनी या निवडणूक प्रक्रियेत रंगत वाढणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पॉवरबाज उमेदवारांकडून दबाव, विनवणी आणि धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता आहे. भाजपने बँक ताब्यात घेण्यासाठी मोच्रेबांधणी सुरू केली असून, राष्ट्रवादीने अजून भूमिका स्पष्ट केली नाही. बँकेतील राजकीय घडामोडींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बँकेच्या निवडणूक आखाडय़ात एकूण १६२ उमेदवार आहेत. २४ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सोमवापर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नव्हता. शेवटच्या तीन दिवसांत अर्ज मागे घेण्यासाठी दिग्गज उमेदवारांकडून विनवणी आणि दबावतंत्राचा वापर केला जाऊ शकतो. अर्जाची छाननी झाल्यानंतर तब्बल १५ दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत असतानाही हालचालींना वेग आला नाही.
माजी संचालकांच्या नातेवाईकांनी निवडणुकीत अर्ज दाखल केले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत किती उमेदवार अर्ज मागे घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अनेक समर्थकांनी अर्ज दाखल केले. भाजपने बँक ताब्यात घेण्यासाठी मोच्रेबांधणी सुरू केली आहे. भाजपच्या माजी संचालकांचे नातेवाईक िरगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीने जिल्हा बँकेसंदर्भात अजूनही भूमिका स्पष्ट केली नाही. पक्षनिरीक्षक जीवनराव गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बठकीत बँकेच्या विषयाला बगल देण्यात आली. त्यामुळे समर्थक संभ्रमात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी २ मे रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात व्यूहरचना आखली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.