खरीप हंगाम हातचा गेला. आता गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. मात्र, पाऊस आला तरी तो सडा टाकल्यासारखाच येतो, असे चित्र आहे. रेणापूर व चाकूर तालुक्यांत काही भागांत मंगळवारी रात्री पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
जूनमध्ये पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना नंतर मात्र पावसाने ताण दिल्याने पिके मोडण्याची वेळ आली. जिल्हय़ात ५ ते ७ टक्केच पिके काही प्रमाणात हाताला लागली. काही गावांत अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असल्याने ही स्थिती आहे. अन्यथा बहुतेक ठिकाणी पावसाअभावी पिकांनी माना टाकल्यामुळे रब्बी हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. मागील आठवडय़ात औसा, निलंग्याच्या काही गावांत ३० ते ४० मिमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे धाडस केले. त्यानंतर पावसाने पुन्हा हुलकावणी दिली आहे. पेरलेले उगवले असले तरी पुन्हा अशी पिकेही धोक्यात आहेत. आकाशात दररोज ढग जमा होत असले तरी ते बरसत नाहीत. मंगळवारी सायंकाळी रेणापूर, चाकूर तालुक्यांत काही प्रमाणात पाऊस झाला. रेणापूर येथे १०.५०, चाकूर ७.८०, अहमदपूर २.८३, तर लातुरात २.१३ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्हय़ात आतापर्यंत १७७.७३ मिमी पावसाची नोंद झाली.
छतावरील पाण्याची साठवणूक
अडचणीच्या काळातच प्रत्येक बाबीचे महत्त्व लोकांना पटते, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय पाऊस नसल्यामुळे पाण्याबाबत लातूरकर सध्या घेत आहेत. मंगळवारी शहराच्या काही भागांत पावसाच्या सरी बरसल्या. वणवण करूनही पाणी मिळत नसल्यामुळे छतावरील पाणी किमान सांडपाण्यासाठी वापरता येईल, या उद्देशाने घरोघरी छतावरील पाणी गोळा करण्याची घाई दिसून येत होती.