03 March 2021

News Flash

शहरांना कृषी पर्यटनाचे आकर्षण

महाराष्ट्र हे कृषी पर्यटन चळवळीतील देशातील आज एक अग्रेसर राज्य बनले आहे.

शेतीप्रधान भारतातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीपूरक व्यवसायांबरोबरच आता त्यापलीकडेही जाऊन धाडसी पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. ‘कृषी पर्यटन केंद्र’ हा त्याचाच एक भाग. महाराष्ट्र हे कृषी पर्यटन चळवळीतील देशातील आज एक अग्रेसर राज्य बनले आहे.

शेतकऱ्याने आठवडय़ातील पाच दिवस शेतीतील कामे करावीत आणि शनिवार व रविवार या सप्ताहाअखेरीच्या सुट्टीच्या दोन दिवसांत पर्यटकांसाठी शेतावरच गावरान मेजवानीचा बेत, कुडाच्या घरात राहण्याची सोय, गावाकडचे खेळ दाखवावेत, निसर्गाचा आनंद द्यावा.. या अशा वातावरणात हे अनोखे कृषी पर्यटन सध्या सर्वत्र फुलत आहे.  सारे काही ग्रामीण ढंगाचे. गावाकडेही चला असा संदेश देणारा कृषी पर्यटनाचा व्यवसाय आता सर्वत्र तग धरू लागला आहे. सिमेंटच्या जंगलातील फ्लॅट संस्कृतीत वास्तव्य करणाऱ्या, धकाधकीच्या, प्रदूषणाच्या त्रासाने ग्रासलेल्या शहरी मनाला निसर्गाचा शांत-निवांत अनुभव देण्यातून उदयास आलेली नवी पर्यटन संस्कृती. इथले निभ्रेळ वातावरण, अस्सल ग्रामीण संस्कृती, परंपरा, गावरान जेवण, लोकपरंपरा, लोककला तसेच विविध गुणदर्शनाचा मनसोक्त आनंद या शहरी थकलेल्या मनांना कृषी पर्यटन केंद्रातून मिळू लागला आहे. परिणामी, सध्या तारांकित हॉटेल्सकडे पाठ फिरवून अशा ग्रामीण संस्कृतीमधील पाहुणचार घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे कृषी पर्यटन हा सध्या ग्रामीण जनतेसाठी प्रतिष्ठेचा, गावातच रोजगारासह अर्थकारणही साधणारा उत्तम उपक्रम ठरतो आहे.

शहरी लोकांच्या आकर्षणाचाही एक भाग बनला आहे. विशेषत: सलग सुट्टय़ांच्या वेळी, उन्हाळा, दिवाळी, नाताळ सुट्टीवेळी, मुलांचे, लग्नाचे वाढदिवस साजरे करताना या अशा कृषी पर्यटनाकडे अनेक जण वळत आहेत.

पिढय़ान् पिढय़ा नोकरी व व्यवसायामुळे शहरी गजबजाटात राहिलेल्या बहुतांश लोकांची आपल्या गावाशी नाळ तुटली आहे. हे लोक यात्रा, उरूस व देवदर्शन यासाठीच आपल्या गावी धावती भेट देतात. परिणामी, त्यांना आपल्या मुलांना गावची ओळख चित्रातच दाखवावी लागत आहे. या लोकांना शेती, ग्रामीण संस्कृती जवळून अनुभवायची आणि शेतामध्ये राहायचे असेल तर जायचे कुठे? असा पडलेला प्रश्न कृषी पर्यटन केंद्रांमुळे निश्चित सुटला आहे.

अस्सल गावरान जेवणाचा अस्वाद, पिकांच्या हिरवाईतील शिवारामधील फेरफटका, बैलगाडी व ट्रॅक्टरमधील सफर, ग्रामीण खेळ, स्वच्छ व मोकळे वातावरण, गावगाडय़ाची संस्कृती, लोकपरंपरा, कला इथे अनुभवता येते. चुलीवर भाजलेली हातावरील भाकरी, खर्डा, हुरडा, धपाटा, खमंग उसळ, वांग्याचं भरित, भरलं वांगं व भेंडी, गाडग्यातील दही अशा अनेक बाबी शहरी बालगोपाळांना दिलखूश करून टाकतात. तेथील छोटेखानी पशुपालन, शेततळे, फुलबागा, औषधी वनस्पतींचे मळे, प्राणिसंग्रहालय, झुलता पूल, चित्रे व मूर्तीतून साकारलेले ग्रामीण जीवन पर्यटकांना आकर्षित करीत आहे. राज्यातील सातारा, कोल्हापूर, रायगड, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, गड-किल्ल्यांचा परीसर या भागांमध्ये कृषि पर्यटनाचा झपाटय़ाने विस्तार झाला आहे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस पर्यटकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कृषी पर्यटनासाठी  विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्रांना परराज्यातून व परदेशातूनही पर्यटकांनी हजेरी लावल्याचे दाखले आहेत. हा सारा मिलाफ पर्यटकांना सुखावणारा असल्याने बळीराजाला मनस्वी आनंद मिळतो आहे. तर, कृषी पर्यटनाकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणूनही पाहिले जात असल्याने कृषी पर्यटनाची चळवळ जोमाने उभी राहात असल्याचे सुखद चित्र आहे.

शाश्वत ग्रामीण विकास

महाराष्ट्रभर आज पाचशेच्या जवळपास कृषी पर्यटन केंद्रे असून, त्यांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्य़ात आहे. ग्रामीण संस्कृतीचा बाज राखणारा हा उपक्रम असल्याने गावगाडय़ाच्या संस्कृतीचे दर्शन, ग्रामीण आदरातिथ्य, पाहुणचार आदी बाबींची ओळख करून देण्यासाठी विशेषत: सहकुटुंब कृषी पर्यटनाकडे शहरी लोकांचा ओढा वाढतो आहे. महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ अर्थात ‘मार्ट’ तसेच बारामती कृषी पर्यटन विकास संस्था कृषी पर्यटन चळवळीतून शाश्वत ग्रामीण विकासासाठी प्रभावीपणे कार्यरत आहेत.

आर्थिक स्थैर्य देणारी संकल्पना : बारामतीचे पांडुरंग तावरे हे कृषी पर्यटन विकासासाठी गेली दोन दशके झटत आहेत. त्यांच्या मते ही संकल्पना शेतकऱ्याला प्रतिष्ठा व आर्थिक स्थर्य देणारी आहे. गावातच रोजगाराची संधी देण्याचे मोठे कार्य या पर्यटनात आहे. कृषी पर्यटनासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सवलती असून, त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेत आर्थिक उन्नती साधण्याची संधी घ्यावी, असे आवाहन तावरे करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 2:57 am

Web Title: attraction of agricultural tourism agriculture tourism center
Next Stories
1 भीमा कोरेगाव घटनेमागे भाजप, संघ आणि जातीयवादी संघटनांचा हात ; मायावतींचा आरोप
2 काय आहे भीमा कोरेगाव विजय स्तंभाचा इतिहास?
3 भीमा कोरेगावची घटना ही संघ व भाजपा दलितविरोधी असल्याचे ठळक उदाहरण- राहुल गांधी
Just Now!
X