गेल्या चार पाच दिवसांमध्ये पावसाचं भयाण रुप महाराष्ट्राला पाहायला मिळालं. अनेकांनी आपले जीवलग गमावले, घर-संसार मोडून पडला. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, अनेक नेत्यांनी घटनास्थळी जाऊन आपत्तीग्रस्तांची भेटही घेतली. या परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याचबरोबर त्यांनी पूरग्रस्त भागातले दौरे टाळण्याचं आवाहन राजकीय नेत्यांना केलं. यावरुनच आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर टीका केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, “आपण करायचे नाही, इतरांना करू द्यायचे असा ठाकरे सरकारचा खाक्या आहे. संकटाच्या काळातही राजकारण सुटत नाही. बिघडलेला रिमोटही याला अपवाद नाही. कोकणात भाजपा नेते पोहोचले तेव्हा प्रशासनाचा गाडा हलला. असं ट्विट करत त्यांनी शरद पवारांना टॅगही केलेलं आहे.”


आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या नेत्यांच्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे. पवार म्हणाले, “पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे या नेत्यांच्या दौऱ्यावर आमची हरकत नाही. पण, मला असं वाटतं की, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी दौरे करून कामात सुसूत्रतेवर लक्ष दिलं पाहिजे.”

आणखी वाचा- पूरग्रस्त भागातील दौरे टाळा; शरद पवारांचं राजकीय नेत्यांना आवाहन

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचं मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होतं म्हणून मला असं वाटतं की, माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं”, असं पवार यांनी सांगितलं.