मुख्यमंत्रीपदाची हौस भागवण्यासाठी विश्वासघाताने मिळवलेल्या खुर्चीला न्याय देण्यासाठी गेल्या १५ महिन्यात मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात फिरकलेले नाहीत, अशी टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री घरात बसून काम करत असल्याची टीका वारंवार विरोधकांकडून केली जात आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची भेट होत नसल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांमध्येही नाराजीचा सूर आहे.

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर आपल्या ट्विटर हँडलवरुन सतत महाविकास आघाडी तसंच ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका करत असतात. मुख्यमंत्र्यांच्या घरी बसून काम करण्यावरही त्यांनी टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “मुख्यमंत्रीपदाची हौस भागवण्यासाठी विश्वासघाताने मिळवलेल्या खुर्चीला न्याय देण्यासाठी गेल्या १५ महिन्यात मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात फिरकलेले नाहीत. कधी मातोश्री, कधी वर्षा तर कधी सह्याद्री अतिथीगृहावरुन बसून उंटावरुन शेळ्या हाकत आहेत”.


भातखळकर कायम आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधत असतात. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद रद्द केल्याने कालही भातखळकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकांमध्ये रणनीती निश्चित करण्यात आली. दोन दिवसांचेच अधिवेशन असल्याने विरोधकांबरोबर होणारा चहापानाचा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला होता. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषददेखील रद्द केल्याने विरोधकांनी निशाणा साधला आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे अशी टीका केली आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधीमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस झालेले नाही. १७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे….” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.