राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कृषी मालाच्या विक्री मूल्यावर शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत बंद करण्याचा निर्णय राज्याचे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी घेतल्यानंतर अपेक्षेप्रमाणे या निर्णयाविरोधात व्यापारी एकजूटले आहेत. हा निर्णय रद्द होत नाही किंवा त्यास स्थगिती मिळत नाही, तोपर्यंत २२ डिसेंबरपासून  कोणत्याही शेतमालाच्या लिलावात सहभागी न होण्याचा इशारा जिल्ह्णाातील व्यापारी संघटनांनी दिला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पणन संचालक डॉ. माने यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आडत देण्यापासून मुक्ती मिळणार असून शेतीमालाच्या विक्रीवर होणारा खर्च वाचणार आहे. बाजार समित्यांमध्ये होणाऱ्या शेतीमालाच्या खरेदी-विक्रीवर अडते हे तीन ते १० टक्क्यांदरम्यान अडत घेतात. त्यासाठी बाजार समित्यांकडून परवानाही त्यांना देण्यात येतो. लासलगावसह जिल्ह्णाातील सर्व बाजार समित्यांच्या वतीने आडत बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील पत्र व्यापारी संघटनांना देण्यात आले. त्यानंतर पिंपळगाव बसवंत येथे जिल्हा कांदा व्यापारी संघटनेसह जिल्हा व्यापारी संघटनेची रविवारी दुपारी बैठक झाली.  या बैठकीत आडत बंदीच्या निर्णयाविरोधात सोमवारपासून बाजार समित्यांमधील कोणत्याही प्रकारच्या शेतीमाल लिलावात सहभाग न घेण्याचे ठरविण्यात आले. यामुळे लासलगाव बाजार समितीतील लिलाव सोमवारपासून बेमुदत बंद राहणार असल्याची माहिती सभापती नानासाहेब पाटील, सचिव बी. वाय. होळकर यांनी दिली. लासलगावसह जिल्ह्णाातील एकूण १५ बाजार समित्यांचे लिलावही बंद राहणार असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.