ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सध्या वापरत असलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा येत्या रविवारी राळेगणसिद्धीमध्ये लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावातून मिळणाऱया पैशांमधून अण्णा नवी गाडी विकत घेणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून अण्णा महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील दौऱयांसाठी स्वतःची गाडी वापरतात. मात्र, पहिल्यांदाच अशा पद्धतीने त्यांच्या गाडीचा लिलाव होतो आहे. अण्णांना सध्या पाठदुखीचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी सध्याची गाडी लिलावात विकून त्यातून मिळालेल्या पैशातून नवी गाडी विकत घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी एकदा अण्णांची गाडी चोरीला गेली होती. त्यानंतर त्यांनी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ गाडी विकत घेतली. गेल्या सहा वर्षांपासून ही गाडी ते वापरत होते. या काळात दिल्ली आणि इतर ठिकाणी झालेल्या जनआंदोलनांसाठी अण्णांनी याच गाडीने प्रवास केला होता.