कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीचा खेड तालुक्यातील बंगला अवघ्या ११ लाख ३० हजार रूपयांच्या लिलावात विकला गेला आहे.

गुन्हेगारी जगतावर राज्य करणारा कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिम याचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके हे आहे. या गावात त्याचा बंगला आणि आंब्याची बाग असून लोटे आणि खेड शहर परिसरातील सात ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता आहेत. केंद्र सरकारने त्या ताब्यात घेऊन त्यापैकी ६ मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार, कोविडच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरनसिंगच्या माध्यमातून ही प्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये या मालमत्ता विकत घेणारे दोघेही दिल्लीतील वकील आहेत. सहापैकी चार जागा भूपेंद्र भारद्वाज यांनी, तर उर्वरित दोन अजय श्रीवास्तव यांनी लिलावात बोली लावून विकत घेतल्या आहेत.

दाऊदच्या संपत्तीचा हा दुसऱ्यांदा लिलाव झाला असून या वेळी त्याचा बंगला लिलावातील मुख्य आकर्षण होते. अजय श्रीवास्तव यांनी तो ११ लाख ३० हजारांची बोली लावून विकत घेतला.

मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर दाऊद भारतातून फरारी झाला. त्यानंतर त्याच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार मुंबईतील दाऊदच्या काही मालमत्तांचा यापूर्वीच लिलाव झाला आहे. मंगळवारी त्याच्या कोकणातील मूळ गावामध्ये असलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया पार पडली.

मात्र बोली लावणारे संबंधित दोन दिल्लीस्थित वकील खरोखरच तटस्थ ग्राहक आहेत, की त्यांचे कुठे तरी लागेबांधे आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.