कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिम कासकर याचे मूळ गाव असलेल्या खेड तालुक्यातील मुंबके येथील मालमत्तेचा १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार असून केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी खेड येथे येऊन लिलाव केल्या जाणाऱ्या मालमत्तेची पाहणी केली.

लिलावात भाग घेणारे बोलीधारकही या वेळी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत उपस्थित होते. गुन्हेगारी जगतावर राज्य करणारा कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिम याचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मंबके हे आहे.

या गावात त्याचा बंगला आणि आंब्याची बाग असून लोटे आणि खेड शहर परिसरातील सात ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता आहेत. केंद्र सरकारने या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

यानुसार १० नोव्हेंबर रोजी हा लिलाव होणार आहे. मात्र कोविडच्या संकटामुळे तो प्रत्यक्ष जागेवर येऊन न करता मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरनसिंगच्या माध्यमातून होणार आहे.

या पार्श्वभूमीवर लिलावात भाग घेऊ  इच्छिणाऱ्यांना संबधित मालमत्ता दाखवणे गरजेचे असल्याने केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाचे अधिकारी यशवंत मोंडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बोलीधारकांसह खेड येथे येऊन मुंबके, लोटे व खेड शहरातील मालमत्तेची पाहणी केली.