नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात दाखल झालेल्या गुन्हय़ाच्या तपासासाठी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास आणखी कोणती कागदपत्रे हवी आहेत, याची यादी दिली आहे. त्यात लेखापरीक्षण अहवालाचाही समावेश आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या ५३ आरोपींपैकी कोतवाली पोलिसांनी अद्यापि कोणालाही अटक केली नाही किंवा आरोपींपैकी कोणीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला नसल्याचे समजले. अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल करण्यासाठी आरोपी, त्यांचे वकील सध्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत.
बँकेच्या पुणे, काष्टी, केडगाव, बाजार समिती व सर्जेपुरा येथील शाखांमध्ये सन २००९-१० या वर्षांत सुमारे १ कोटी ७६ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून लेखापरीक्षक चंद्रकांत पवार यांच्या फिर्यादीनुसार, कोतवाली पोलीस ठाण्यात बँकेचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी, ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा यांच्यासह आजी-माजी संचालक, आजी-माजी अधिकारी, कर्जदार अशा एकूण ५६ जणांविरुद्ध अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढिकले करत आहेत.