प्रसिद्ध आणि वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना महाराष्ट्रातल्या औरंगाबादमध्ये विरोध सहन करावा लागला. अजिंठा वेरूळ या लेणी जगभरात प्रसिद्ध आहेत, या लेणी पाहण्यासाठी तस्लिमा नसरीन या औरंगाबाद एअरपोर्टवर आल्या होत्या. मात्र त्या विमानतळावर उतरताच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ‘गो बॅक तस्लिमा’ अशा घोषणा दिल्या. तस्लिमा नसरीन यांना विमानतळावरून बाहेरच पडू दिलं नाही त्यामुळे अखेर त्यांना त्यांचा औरंगाबादमध्ये सुट्टी घालवण्याचा बेत रद्द करावा लागला.

तस्लिमा नसरीन या त्यांच्या मुलीसह औरंगाबादमध्ये आल्या होत्या. मात्र त्या येणार याची कुणकुण एआयएमआयएमला आधीच लागली होती. त्याचमुळे इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखाली तस्लिमा नसरीन यांच्या विरोधात औरंगाबाद विमान तळावरच मोर्चा काढण्यात आला. तस्लिमा नसरीन या बांग्लादेश मधल्या लेखिका आहेत.

मुस्लिम धर्मगुरू आणि मुस्लिम समाजाच्या प्रथांविरोधात त्यांनी वादग्रस्त लिखाण केलं आहे. लज्जा या त्यांच्या कादंबरीवरूनही बराच वादंग माजला होता. या वर्षाच्या सुरूवातीलाच जानेवारी महिन्यात जयपूर साहित्य संमेलनातही त्यांना अशाच विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. तस्लिमा यांच्या लेखांमुळे आणि वादग्रस्त पुस्तकांमुळे जगभरातल्या मुस्लिम बांधवांची मनं दुखावली आहेत, त्याचमुळे औरंगाबादमध्ये त्यांना प्रवेश करू द्यायचा नाही असा निर्णय आम्ही घेतला होता असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

तस्लिमा नसरीन यांनी त्यांच्या मित्राच्या नावे औरंगाबादच्या एका हॉटेलमध्ये दोन खोल्याही बुक केल्या होत्या, या हॉटेलबाहेरही एआयएमआयएमचे शेकडो कार्यकर्ते तस्लिमा नसरीन यांचा विरोध करण्यासाठी उभे होते. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनीही तस्लिमा नसरीन यांना परतण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्या एअरपोर्टवरूनच मुंबईला रवाना झाल्या.