वर्ध्यामधील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्र अशाच एका घटनेने हदरला आहे. औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये महिला ९५ टक्के भाजल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संतोष मोहिते या तरुणाला अटक केली आहे. ५० वर्षीय पीडित महिला ही गंभीररित्या भाजली असून तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

नक्की वाचा >> हिंगणघाट पीडित तरुणीवर उपचार करताना कुटुंबाची फरफट

आरोपी संतोष हा गावामध्ये बिअर बार चालवतो. संतोष आणि या महिलेमध्ये एका शुल्लक कारणावरुन वाद झाल्यानंतर त्याने तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडली. पोलिसांनी तातडीने संतोषला ताब्यात घेतलं आहे. गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी संतोषला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

त्या तरुणीची प्रकृती चिंताजनक

एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने जाळल्यामुळे जीवन-मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या तरुणीवर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंगणघाटच्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयासाठी अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीवर एका माथेफिरुन पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  या प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर आधीच दबा धरून बसला होता. तिला पाहताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि अतिशय निदर्यतेने तिला जाळण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर काहींनी तिच्या अंगावर पाणी ओतून आगीवर नियंत्रण आणले. मात्र, तोपर्यंत ती ४० टक्के भाजली. तिला आधी हिंगणघाट रुग्णालयात आणि नंतर नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिचा चेहरा पूर्णपणे जळाला असून, ती वाचाही गमावण्याची भीती आहे. तसेच डोळे गमावण्याचीही शक्यता आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.