21 January 2019

News Flash

औरंगाबाद हिंसाचार: एसीपी गोवर्धन कोळेकरांची प्रकृती गंभीर, मुंबईत होणार उपचार

जमावाला पांगवण्यासाठी ते स्वतः पुढे गेले तेव्हा एक दगड त्यांच्या गळ्याला लागला. ज्यामुळे त्यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाली.

तीन-चार किरकोळ घटनांचे पर्यवसान दोन गटांतील हाणामारीपर्यंत गेले आणि औरंगाबाद शहर पेटले. मोती कारंजा भागातून सुरू झालेली दंगल जुन्या शहरात पसरली.

तीन-चार किरकोळ घटनांचे पर्यवसान दोन गटांतील हाणामारीपर्यंत गेले आणि औरंगाबाद शहर पेटले होते. दगडफेक, दुकाने आणि वाहनांना आगी लावण्याचे प्रकार यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले. दरम्यान, या घटनेत औरंगाबादचे सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर हे गंभीर जखमी झाले होते. कोळेकर यांच्यावर औरंगाबादेतील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. जमावाला पांगवण्यासाठी ते स्वतः पुढे गेले तेव्हा एक दगड त्यांच्या गळ्याला लागला. ज्यामुळे त्यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्यांना श्वसनास त्रास होत आहे. कोळेकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे रूग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना मुंबईला नेण्यात येणार असल्याचे समजते. डॉक्टरांनीही कोळेकर यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले आहे.

धाडसी पोलीस अधिकारी म्हणून कोळेकर यांची ख्याती आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणाचे पडसाद औरंगाबाद शहरात उमटले होते. त्यावेळीही जमावाला पांगवण्यासाठी ते स्वत: पुढे गेले होते. त्यावेळीही त्यांना दगड लागला होता.

दरम्यान, औरंगाबाद जाळपोळ प्रकरणी अडीच हजारांहून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ५० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हत्येचा प्रयत्न आणि दंगल भडकवण्यासह इतर कलमांअंतर्गत क्रांती चौक, जिन्सी पोलीस ठाणे आणि सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

First Published on May 14, 2018 9:51 am

Web Title: aurangabad clash asst commissioner of police govardhan kolekar is being shifted to mumbai as his condition is critical