लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा उत्साह विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान दिसून आला नसला, तरी जिल्हय़ात सुमारे ६० टक्के मतदान झाले. ९ मतदारसंघांत मतदानादरम्यान ‘व्हीव्हीपॅट’च्या प्रयोगामुळे निवडणूक यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. बॅटरी संपल्याने, तसेच प्रिंट बाहेर येत नसल्याच्या काही तक्रारी शहरातील मतदानकेंद्रांत होत्या. तथापि अन्य मतदारसंघांत मतदान प्रक्रिया सुरळीत होती. पैठण मतदारसंघात सर्वाधिक ६५.२४ टक्के, तर फुलंब्री येथे सर्वात कमी ५१.३५ टक्के मतदान झाले.
औरंगाबाद शहरातील तीन विधानसभा क्षेत्रांत या वेळी प्रथमच मजलिस-ए-इत्तिहादुल-मुसलमिन (एमआयएम) या पक्षाने उमेदवार दिले असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांची दमछाक होत असल्याची चर्चा मतदानादरम्यान होती. मतदान सुरळीत पार पडावे, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, मंगळवारी रात्री शिवसेनेच्या तिघांकडून ५५ हजार रुपये जप्त करण्यात आले. एका मोटारीतून आरोपी कैलास चंद्रभान मस्के, उत्तम मस्के व गाडीचालक निकम यांच्याकडून ही रक्कम जप्त झाली. शहरातील अहमदनगर फोर्जिग या कंपनीने कामगारांना मतदानासाठी सुटी न दिल्याची तक्रारही प्रशासनाकडे आली होती, मात्र कामगार आयुक्तांनी नोटीस बजावल्यानंतर या कंपनीने सुटी जाहीर केली.
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात व्हीव्हीपॅट या नव्या यंत्राशी जुळवून घेताना कर्मचाऱ्यांना अडचणी येत होत्या. काही ठिकाणी या मशिनही बदलाव्या लागल्या. मतदानयंत्रात मात्र कोठेही बिघाड झाला नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचेही वृत्त होते. पाठीमागच्या बाजूला त्यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगड फेकला. याबाबतची तक्रार नोंदविण्यात आली नव्हती.
सकाळी ७ ते ११ या दरम्यान सुमारे २० ते २२ टक्के मतदान झाले होते. गंगापूर व वैजापूर तालुक्यांत मात्र मतदानाचा वेग तुलनेने कमी होता. दुपारी एकपर्यंत ही आकडेवारी ३२ टक्क्यांपर्यंत गेली. दुपारी ३ वाजता पैठणमध्ये सर्वाधिक ५१.९६ टक्के, तर इतरत्र सरासरी ४० ते ४४ टक्के मतदान नोंदविले गेले. सायंकाळी ५ वाजता जिल्हय़ातील ९ मतदारसंघांत ५८.६२ टक्के मतदान झाले होते. पैठणमध्ये सर्वाधिक ६५.२४, तर फुलंब्रीत सर्वात कमी ५१.३५ टक्के मतदान नोंदविले गेले.
सायंकाळी पाचपर्यंत मतदारसंघ व मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : सिल्लोड ६५.०६, कन्नड ६०.८०, औरंगाबाद मध्य ५९.२४, औरंगाबाद पूर्व ६१.६९, औरंगाबाद पश्चिम ५७.१०, गंगापूर ५४.४० व वैजापूर ५३.४६.