औरंगाबादमधील खुलताबाद येथील दर्ग्यातील मौलानाने वादग्रस्त दावा केला आहे. दर्ग्यात आसेचे झाड असून या झाडाचे फळ खाल्ल्यास निपुत्रिकांना मुले होतात. इतकंच नव्हे ही फळ खाल्ल्यास तृतीयपंथीयांनी देखील मूल होऊ शकेल, असा दावा मौलानांनी केला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या औरंगाबादमधील कार्यकर्त्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून हा प्रकार समोर आला असून संबंधित मौलानांविरोधात जादू टोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

खुलताबाद येथे हजरत शेख शा जलालउद्दीन गंजे रवा सफरवर्दी यांचा दर्गा आहे. या दर्गा परिसरात आसेचे झाड आहे. तसेच ‘परीयो का तालाब’ देखील आहे. दर्गा परिसरातील आसेच्या झाडाबाबतच्या चमात्कारांचा दावा मोहम्मद समीर मुजावर या मौलानांनी केला आहे. आसेच्या झाडाचे फळ खाल्ल्यास निपुत्रिकांना अपत्यप्राप्ती होते, असा दावा मौलानांनी केला आहे. तसेच परिसरातील ‘परीयो का तालाब’ येथे आंघोळ केल्यास त्या व्यक्तीच्या अंगात असलेले भूत, प्रेतात्मा निघून जातात, दुर्धर आजारही बरा होतो, लग्न जमेत नसेल तर लग्नही होते, असा दावाही मौलानांनी केला. महाराष्ट्र अंनिस कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे हा प्रकार समोर आणला आहे.

मौलानाने अवैज्ञानिक चमत्कारांचा दावा करुन जनतेची फसवणूक केली आहे. हा जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा ठरतो, असे शहाजी भोसले यांनी म्हटले आहे. शहाजी भोसले, प्रशांत कांबळे, सुनील उबाळे आणि सुनील चोतमल यांनी पोलिसांची भेट घेतली. अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.