उंटांची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक औरंगाबाद पोलिसांनी शनिवारी जप्त केला. या ट्रकमध्ये एकूण १४ उंट होते, मात्र त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. उर्वरीत उंटांची सुटका करण्यात आली असून सध्या त्यांना गायींसाठी तयार करण्यात आलेल्या निवाऱ्यामध्ये ठेवण्यात आले आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.


 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजस्थानहून आणलेले हे उंट हैदराबादला कत्तलखान्यात नेण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी सापळा रचून उस्मानाबादजवळ ट्रक अडवला. सूत्रांच्या माहितीनुसार दोन गाड्यांमध्ये २७ उंट होते. यातील एक गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांकडून आता दुसऱ्या ट्रकचा शोध घेतला जात आहे. यामागे एखादं रॅकेट असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.