कल्याण- डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारासू आणि औरंगाबाद महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची शुक्रवारी बदली करण्यात आली. कचराप्रश्न हाताळण्यात अपयशी ठरल्याने दोघांची बदली करण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.
औरंगाबादमधील कचरा प्रश्न पेटला असून याचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते. शेवटी राज्य सरकारने औरंगाबाद महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची शुक्रवारी बदली केली. मराठवाडा विकास महामंडळाच्या सचिवपदी त्यांची बदली करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नावरुन आंदोलन सुरु असताना पोलिसांनी आंदोलकांच्या घरावर दगडफेक केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यापाठोपाठ महापालिका आयुक्तांचीही बदली झाली आहे. त्यामुळे कचरा प्रश्नाचे खापर प्रशासनावर फोडून राज्यकर्ते जबाबदार झटकत आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कल्याण- डोंबिवली महापालिकेचे आयुक्त वेलारासू यांची देखील बदली करण्यात आली आहे. वेलारासू यांना राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सह-सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागी कल्याण- डोंबिवलीच्या आयुक्तपदी जी एम बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण- डोंबिवलीतही कचरा प्रश्न कायम असून आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरुन हायकोर्टाने ताशेरे ओढले होते. मात्र अजूनही यावर तोडगा निघालेला नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2018 2:13 pm