खासदार जलील यांच्या अभिनंदनावरून राजकारण; राजदंडाची पळवापळवी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून औरंगाबाद महानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये संघर्ष झाला. पाणीप्रश्नाआड खासदार जलील यांचे अभिनंदन केले जाऊ नये म्हणून राजकारण पेटले. पाणीप्रश्नावरून भाजप सदस्यांनी एकवेळ राजदंड पळवला. या प्रकारानंतर पुन्हा राजदंड पळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपचीच री ओढत एमआयएमच्या नगरसेवकांनीही राजदंड पळवला. गोंधळ घालणारे बहुतांश नगरसेवक भाजपचे असले तरी महापौर नंदकुमार घोडेले यांनी मात्र एमआयएमच्या सहा सदस्यांना एक दिवसासाठी निलंबित केले. या गदारोळामुळे एमआयएमच्या गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना आवरण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले.

औरंगाबाद महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेना, भाजप आणि काँग्रेस सदस्यांनी पाणीप्रश्न पुढे करून एमआयएमला एकाकी पाडले. त्यामुळे गोंधळ उडाला. महापौरांना दोन वेळा सभा तहकूब करावी लागली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, मतदानाची प्रक्रिया पार पाडल्यानंतरची ही पहिलीच सर्वसाधारण सभा होती. या सभेत पाणीप्रश्न पेटणार, हे अपेक्षित होते. मात्र, या पाणीप्रश्नाआडून नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचे अभिनंदन न करण्याचे राजकारणच अधिक पेटले. सभेच्या प्रारंभीच माजी महापौर बापू घडमोडे यांनी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार महापौरांनी मोदी यांचे अभिनंदन केले. त्यानंतर लगेच महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या ‘एमआयएम’च्या सरिता बोर्डे यांनी खासदार इम्तियाज जलील यांचेही अभिनंदन करावे, असा प्रस्ताव मांडला. मात्र, त्याकडे लक्ष न देता महापौरांनी शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्न उपस्थित केला. पाणीप्रश्नावरून भाजप सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. महापौरांच्या व्यासपीठाजवळ जाऊन नगरसेवकांनी ठिय्या मांडला. या गोंधळामुळे सुरुवातीच्या काही मिनिटांतच सभा पाच मिनिटांसाठी तहकूब करावी लागली. दुसऱ्या वेळी सभा सुरू झाल्यानंतरही पाणीप्रश्नावरून भाजप, शिवसेनेच्या सदस्यांचा गोंधळ सुरूच होता. त्यातही ‘एमआयएम’चे नगरसेवक खासदार जलील यांचे अभिनंदन करण्यासाठी आग्रही होते. जलील यांचे अभिनंदन करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे पाहून जमीर कादरी यांनीही राजदंड उचलला. त्यानंतर पुन्हा भाजप सदस्य राजदंड पळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, चोपदारांनी राजदंड पकडून ठेवल्याने राजदंड हलवता आला नाही. ‘एमआयएम’च्या नगरसेवकांनी आयुक्त डॉ. विनायक निपुण यांनाही खासदार जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव घेण्याची सूचना करण्याविषयी विनंती केली. मात्र, आयुक्तांनी कुठलीही भूमिका घेतली नाही. गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याचे पाहून सभा थांबवली. त्यानंतर सिटी चौक पोलिसांचा मोठा ताफा महापालिकेच्या आवारात आला. दरम्यान एमआयएमचे नगरसेवकही ठिय्या मांडून बसले होते. विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनी महापौरांची भेट घेऊन इम्तियाज जलील यांचा नामोल्लेख टाळून किमान औरंगाबादचे खासदार यांचे अभिनंदन, असे तरी म्हणा, अशी मागणी केली. महापौरांनी तीही धुडकावली.

अफसरखान यांची जलील यांच्यावर टीका

काँग्रेसचे नगरसेवक अफसरखान यांनी  ‘एमआयएम’ने मांडलेल्या खासदार जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावास जोरदार विरोध केला. खासदार जलील यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीकाही त्यांनी केली. जलील यांनी गुटखा, दारूबंदीविरुद्ध उघडलेली मोहीम बेगडी असून गुटखाकिंग असलेल्यांसोबत बँकॉकमध्ये हातमिळवणी केल्याचा आरोप अफसरखान यांनी केला.