बंडखोरांना पक्षातून पाठिंबा नाही हे मतदारांना कळावे, या साठी युतीचे नेते २१ वॉर्डामध्ये संयुक्त प्रचारफेरी काढणार आहेत. याउपरही कोणत्या नेत्याने बंडखोरांना पाठिंबा दिलाच, तर त्याची पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला. युतीच्या नेत्यांची वॉर्डातील बंडखोरी आणि त्यांना पक्षातील नेत्यांकडून मिळणारे प्रोत्साहन लक्षात घेऊन संयुक्त बैठक सोमवारी घेण्यात आली. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या भूमिकेवरून बैठकीत गदारोळ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरातील गुलमंडी वॉर्डातून तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी उभे आहेत. याच वॉर्डातून खासदार चंद्रकांत खरे यांनी पुतणे सचिन खरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तनवाणी यांच्या बंधूंची बंडखोरी सध्या चर्चेत आहे. या पाश्र्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष दानवे, पक्षाचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्यासह संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, खासदार खरे, आमदार संजय शिरसाठ, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह प्रमुख नेत्यांची बठक सोमवारी घेण्यात आली. बंडखोरीसंदर्भात बैठकीत विस्ताराने चर्चा झाली. सुशील खेडकर, गजानन बारवाल, तसेच समर्थनगर वॉर्डातून बंडखोरांना मदत होत असल्याने नेते हैराण होते. महापौर कला ओझा यांच्या वॉर्डातही बंडखोरांना मदत केली जात असल्याचा आक्षेप असल्याने त्यावर चर्चा झाली. मात्र, वैयक्तिक नावावर चर्चा झाली नाही, असे दानवे यांनी सांगितले. जेथे बंडखोर उभे आहेत तेथे अधिकृत उमेदवारांचाच दोन्ही पक्षाने प्रचार करावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. तब्बल २१ ठिकाणी बंडखोरी झाल्याने दोन्ही पक्षांचे नेते हैराण आहेत. या पाश्र्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीतील संयुक्त प्रचाराचे तत्त्व किती ठिकाणी अंमलबजावणीत येते, यावर बरेच काही अवलंबून आहे.
…..
बंडोबांना थंड करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. संयुक्त प्रचार फेरी काढण्याचे ठरविण्यात आले असल्याने जी मंडळी अपक्ष बंडखोर म्हणून रिंगणात आहेत, ती आता सक्रिय राहणार नाहीत, अशी काळजी घेतली जाईल.
– रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष भाजप

बंडखोरीबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र, कोणत्याही वैयक्तिक नावावर चर्चा नव्हती. संयुक्त प्रचार करण्याचे ठरले आहे. ज्या ठिकाणी बंडखोर उभे आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचेही ठरले आहे.                               

अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना</strong>