मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वृक्षतोडीला विरोध दर्शवत ‘आरे’तील मुंबई मेट्रोशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. या निर्णयाबद्दल कौतूक होत असतानाच औरंगाबाद शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोशल मीडियातून प्रश्न विचारण्यात येत होते. अखेर औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी या प्रकरणावर खुलासा केला आहे. एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार आहे. प्रशासनाला तसे आदेश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो कारशेडच्या उभारणीसाठी आरेतील झाडे तोडण्यात आली होती. याला शिवसेनेनं विरोध केला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवत ‘आरे’तील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. मात्र, या निर्णयाच्या काही दिवसानंतरच औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून बराच गोंधळ सुरू झाला होता. अनेकांनी सोशल मीडियातून यावर प्रश्न उपस्थित केले होते.

यासंदर्भात औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयीची महापालिकेची आणि प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. महापौर घोडेले म्हणाले, “औरंगाबाद शहरातील एमजीएम विद्यापीठाशेजारी प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार आहे. १७ एकर जागेवर हे स्मारक होणार आहे. त्यासाठी ६४ कोटींची निविदा प्रक्रिया विचाराधीन आहे. शासनाकडून ५ कोटी रूपये मिळाले आहेत. निधी उपलब्ध करून देण्याचं शासनाने आश्वासित केलं आहे. हे स्मारक करण्यासाठी तत्कालीन सरकारने हे मंजूरी दिली होती. सध्या एक विषय चर्चेत आहेत. लावण्यात आलेली झाडे तोडून स्मारक बनवणार आहोत, असं बोललं जात आहे. महापौर म्हणून मी खुलासा करतो की, एकही झाड न तोडता स्मारक उभारण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. उद्धव ठाकरे यांनी जागेची पाहणी करताना झाडं न तोडता स्मारक व्हावं असे आदेश दिले होते. उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच आमचाही झाडं तोडण्याला विरोध आहे,” असं घोडेले म्हणाले.

“आरे संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. आम्ही सुद्धा झाडाच्या पानालाही हात न लावता स्मारक करू. यासंदर्भात वेळ घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार आहोत. महापालिका प्रशासनानं मागे न्यायालयातही शपथपत्र दिलं होत की, आवश्यक असतील ती झाडं तोडू. पण, आता महापालिका प्रशासनाची भूमिका बदण्यास सांगण्यात येईल आणि एकही झाडं न तोडता स्मारकं उभारू. तसे आदेश लवकरच प्रशासनास देण्यात येतील,” असा दावा घोडेले यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad municipal mayor ghodele said we will build memorial without cutting a single tree bmh
First published on: 08-12-2019 at 17:02 IST