दहशतवादी विरोधी पथकाने अटक केलेल्या इसिसच्या दहशतवाद्यांची 27 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना सोमवारी विशेष न्यायाधीश के.आर. चौधरी यांच्या समोर हजर केले. तपास अधिकारी आणि मुख्य सरकारी वकिलांनी या गुन्ह्यात पुन्हा दहशतवादी अटक होऊ शकतात त्यामुळे पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेऊन नऊ जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. न्यायालयाने ही मागणी ग्राह्य धरुन त्या नऊ जणांना 14 दिवसांची, 5 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामूळे त्या नऊ जणांची आज पोलीस बंदोबस्तात हर्सूल कारगृहात रवानगी करण्यात आली.

एटीएसच्या पथकाने 22 जानेवारी रोजी उमते महंमदिया ग्रुपच्या मुंब्रा आणि संभाजीनगरातील इसिसच्या मोहसीन सिराजुद्दीन खान (32, दमडी महल), महंमद मशाहिद उल इस्लाम (23, वैâसर कॉलनी), महंमद सरफराज उर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (23, राहत कॉलनी), महंमद तकी उर्फ अबू खालेद सिराजोद्दीन खान (20, वैâसर कॉलनी) एक विधिसंघर्ष बालक, ठाण्यातील मुंब्रा येथील जमान नवाब खुटेउपाड (32, मुंब्रा, ठाणे), सलमान सिराजुद्दीन खान (28, मोतीबाग, मुंब्रा, ठाणे), फहाद महंमद इस्तियाक अन्सारी (अल्माश कॉलनी, मुंब्रा, ठाणे), मजहर अब्दुल रशिद शेख (21, मुंब्रा, ठाणे) तलहा उर्फ अबुबकर हनिफ पोतरिक (रा. मुंब्रा) या दहा जणांची 27 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना सोमवारी विशेष न्यायाधीश के आर. चौधरी यांच्या समोर हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकारी आणि मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी 27 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये महत्वपूर्ण माहिती हाती लागली आहे असं न्यायालयाला सांगितलं.

दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या हार्डडिस्क, विष, स्फोटक द्रवे तपासणीसाठी न्याय वैद्यक प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आला आहे. त्याचा विश्लेषणात्मक अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. तो अहवाल प्राप्त झाल्यावर त्याची चौकशी करावी लागणार आहे. चौकशी करताना या नऊ अतिरेक्यांच्या पोलीस कोठडीची अवश्यकता लागू शकते त्यामुळे पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी देशपांडे यांच्याकडून करण्यात आली. 27 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये दहशतवाद्यांनी देशहिताच्या दृष्टीकोनातून दिलेली महत्त्वपूर्ण माहिती सार्वजनिक करत येत त्यामुळे न्यायालयासमोर केस डायरी सादर करण्यात आली. न्यायालयाने ही बाब ग्राह्य धरत त्या 9 जणांना 5 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.